गुहागरहून हिंगोलीला निघालेले बेपत्ता शिक्षक कुटुंबीयांसह सुखरूप सापडले, नेमकं काय घडलं.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:56 IST2025-08-28T12:54:59+5:302025-08-28T12:56:18+5:30

चिपळूण परिसरात असताना त्यांचा अचानक संपर्क तुटला होता

Missing teacher who left Guhagar for Hingoli found safe with family | गुहागरहून हिंगोलीला निघालेले बेपत्ता शिक्षक कुटुंबीयांसह सुखरूप सापडले, नेमकं काय घडलं.. वाचा

गुहागरहून हिंगोलीला निघालेले बेपत्ता शिक्षक कुटुंबीयांसह सुखरूप सापडले, नेमकं काय घडलं.. वाचा

चिपळूण : गुहागर तालुक्यात कार्यरत असलेले शिक्षक ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी व मुलासह गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर गुरुवारी सकाळी त्यांचा माण तालुक्यातील गोंदवले महाराज मठ परिसरात शोध लागला आहे. चव्हाण कुटुंब दर्शनासाठी गोंदवले येथे आले असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. स्थानिकांनी त्यांना ओळखताच संबंधित अधिकाऱ्यांना व नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर दूरध्वनीद्वारे संपर्क होऊन ते सर्वजण सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.  
   
गणेशोत्सवाच्या निमित्ताने चव्हाण कुटुंब आपल्या मूळ गावी हिंगोलीकडे निघाले होते. मात्र, मंगळवारी संध्याकाळी चिपळूण परिसरात असताना त्यांचा अचानक संपर्क तुटला होता. मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संवाद साधता न आल्याने नातेवाईकांनी तक्रार नोंदवली होती. पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात होती. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आज सकाळी सुखरूप शोध लागल्याने नातेवाईक, सहकारी शिक्षक व गावकऱ्यांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. प्रशासनानेही त्यांच्या सुखरूप शोध लागल्याची पुष्टी केली आहे.

पती, पत्नी व दोन मुल असं असलेलं चव्हाण कुटुंब चिपळूणहून कुंभार्ली घाटातून प्रवास करीत असताना त्यांचा एक मोबाईल पाण्यात भिजल्याने बंद पडला. तसेच दुसऱ्या मोबाईलचे चार्जिंग संपल्याने तोही बंद पडला. त्यामुळे चव्हाण कुटुंबियांचा संपर्क तुटला. त्यानंतर ते बेपत्ता झाले असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे त्यांची चौकशी सुरु होती. याचदरम्यान त्यांची गाडी हेळवाकहून पाठणच्या दिशेने निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध झाले होते. मात्र आता हे कुटुंब सुखरूप असून त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाल्याने कुटुंबीय सुखावून गेले आहेत.

Web Title: Missing teacher who left Guhagar for Hingoli found safe with family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.