Ratnagiri: खेडमधील शामराव पतसंस्थेत ४ कोटींचा अपहार, अध्यक्षांसह १६ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:52 IST2025-08-11T17:52:00+5:302025-08-11T17:52:47+5:30

ठेवीदारांची थेट सहायक निबंधकांकडे तक्रार

Misappropriation of Rs 4 crores in Shamrao Patsanstha in Khed, case registered against 16 people including the chairman | Ratnagiri: खेडमधील शामराव पतसंस्थेत ४ कोटींचा अपहार, अध्यक्षांसह १६ जणांवर गुन्हा दाखल

Ratnagiri: खेडमधील शामराव पतसंस्थेत ४ कोटींचा अपहार, अध्यक्षांसह १६ जणांवर गुन्हा दाखल

खेड : शहरातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ४ कोटी २२ लाख ८१ हजार २१ रुपयांच्या अपहारप्रकरणी तब्बल दीड वर्षांनी खेडपोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपहारप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ताराम बाळा बैकर (रा. भरणे, खेड) यांच्यासह इतर १६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या अपहारप्रकरणी विनोद वामनराव अंड्रस्कर (वय ५४, रा. पिंपरी-मेघे, वर्धा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार १ एप्रिल २०२३ ते २३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत हा अपहार झाला आहे. ठेवीदारांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पतसंस्थेचे १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत लेखापरीक्षण केले असता, ३ कोटी ७९ लाख ६० हजार ६०९ रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच ठेवीदारांची बनावट मुदत ठेव पावत्या छापून ४३ लाख २० हजार ४१२ रुपयांची फसवणूक केल्याचेही उघड झाले. लेखापरीक्षणानंतर पतसंस्थेत ४ काेटी २२ लाख ८१ हजार ०२१ रुपयांचा अपहार झाल्याचे समाेर आले.

याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ताराम बैकर, उपाध्यक्ष सुधाकर रामभाऊ शिंदे (रा. भरणे) यांच्यासह सदस्य दत्ताराम भिकू धूमक (रा. भडगाव, खेड), बाबाराम केशव तळेकर (रा. लवेल, खेड), दीपक केशव शिगवण (रा. गुणदे, खेड), सुरेश कृष्णा पड्याळ (रा. भरणे, खेड), सखाराम सोनू सकपाळ (रा. सुकिवली, खेड), तुकाराम रामू साबळे (रा. सुकिवली, खेड), तेजा राजाराम बैकर (रा. भरणे, खेड), रेवती चंद्रकांत खातू (रा. भरणे, खेड), मुरलीधर दत्तात्रय बुरटे (रा. खेड), सुभाष भिकू शिंदे (रा. भरणे-शिंदेवाडी, खेड) या सदस्यांवर शुक्रवारी (९ ऑगस्ट) रात्री गुन्हा दाखल केला आहे.

त्याचबराेबर माजी उपाध्यक्ष शशिकांत नथुराम शिंदे (रा. नातूनगर, खेड), माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया योगेश सुतार (रा. वेरळ, खेड), राेखपाल अभिजीत रमेश नलावडे (रा. भरणे, घडशीवाडी, खेड) आणि लिपिक रूपेश चंद्रकांत गोवळकर (रा. वेरळ, खडकवाडी, खेड) यांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठेवीदारांची थेट सहायक निबंधकांकडे तक्रार

पतसंस्थेच्या मुदत संपलेल्या ठेवी पावतीवरील रक्कम काढण्यासाठी काही ठेवीदार गेले असता त्यांना रक्कम दिली गेली नाही. ठेवीदारांनी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ठेवी मिळत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, लेखापरीक्षण सुरू असल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली. त्यानंतर ठेवीदारांनी याबाबत सहायक निबंधक कार्यालयात सप्टेंबर २०२४ मध्ये तक्रार दाखल केली हाेती.

Web Title: Misappropriation of Rs 4 crores in Shamrao Patsanstha in Khed, case registered against 16 people including the chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.