‘डेल्टा प्लस’ ला कसे रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:50+5:302021-07-03T04:20:50+5:30

शोभना कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात डेल्टा प्लसचे ९ रुग्ण सापडले आहेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच ...

How to stop 'Delta Plus'? | ‘डेल्टा प्लस’ ला कसे रोखणार?

‘डेल्टा प्लस’ ला कसे रोखणार?

शोभना कांबळे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात डेल्टा प्लसचे ९ रुग्ण सापडले आहेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाची झोप डेल्टा प्लस या व्हेरिएंटने वाढविली आहे. डेल्टा प्लसला रोखण्यासाठी अधिकाधिक लसीकरण होणे गरजेचे असतानाच जिल्ह्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या केवळ ८० हजार ५४९ (२९ जूनपर्यंत) एवढी आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील १३ लाख १५ हजार नागरिकांपैेकी १० लाख ३३ हजार ९३६ जणांना अजूनही पहिल्या डोसची प्रतीक्षा असून १२ लाख ३४ हजार ४५१ जण दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात पुन्हा कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिल्ह्यात १३२ लसीकरण केंद्रे असली तरीही लोकसंख्येच्या तुलनेने अजूनही लसीचा साठा अपुरा असा आहे. सध्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग तयारी करत आहे; मात्र कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण हे प्रभावी अस्त्र असूनही १० लाख ३३ हजार नागरिकांना अद्याप पहिलाही डोस मिळालेला नाही.

रत्नागिरीत सर्वाधिक; मंडणगड सर्वात कमी

रत्नागिरी तालुक्याचे आणि जिल्ह्याचे ठिकाण असल्याने रत्नागिरी शहरात लसीचा पुरवठा अधिक प्रमाणात झाला आहे. त्यामुळे या तालुक्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. २९ जूनअखेर रत्नागिरी तालुक्यातील १५ शासकीय आणि दोन खासगी रुग्णालयांमध्ये मिळून एकूण ५७ हजार ९३७ इतकी लस देण्यात आली आहे. तर मंडणगड तालुक्याची लोकसंख्या कमी असल्याने त्या तुलनेने या तालुक्यातील ५ केंद्रांवर २,७७० जणांनी लस घेतली.

१८ ते ४४ वयोगटात

केवळ ५.५ टक्के

केंद्र सरकारने १ मे २०२१ पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्व व्यक्तींना कोरोना लसीकरण करण्याची घोषणा केली होती; मात्र कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन्हीही कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा देशभरात जाणवू लागताच या वयोगटासाठीचे लसीकरण थांबविण्यात आले.

पुन्हा २१ जूनपासून पुन्हा लसीकरणाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार ही मोहीम सुरू झाली आहे. २९ जूनअखेर सुमारे ६ लाख ४० हजारांपैकी ३४ हजार ६५५ जणांना पहिला डोस दिला आहे. अजूनही सहा लाख व्यक्तींना प्रतीक्षा आहे.

Web Title: How to stop 'Delta Plus'?