आरोग्य विभागात नोकरी लावतो सांगून अकरा लाखांचा गंडा, एका बँक खातेदारासह तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 14:35 IST2026-01-05T14:34:44+5:302026-01-05T14:35:12+5:30
पुन्हा फाेन केलास तर बघून घेईन

आरोग्य विभागात नोकरी लावतो सांगून अकरा लाखांचा गंडा, एका बँक खातेदारासह तिघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी : आराेग्य विभागात नाेकरी लावताे सांगून दाेघांना तब्बल ११ लाख ३९ हजार ५११ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी वर्तकनगर (ठाणे) येथील एका बँक खातेधारकासह तिघांवर रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणुकीबाबत उमेश शांताराम धनावडे (वय ३३, रा. करबुडे-मासेबाव, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हा प्रकार २७ जानेवारी २०२२ ते २७ ऑक्टाेबर २०२५ या कालावधीत घडला आहे. या फसवणुकीप्रकरणी समीर म्हस्के (पूर्ण नाव माहीत नाही), बँक खातेधारक राेहित प्रकाश म्हसकर व अन्य एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर म्हस्के याने उमेश धनावडे यांचा भाऊ तुषार शांताराम धनावडे व अन्य मित्र अजय विजय गाेवळकर यांना आराेग्य विभागामध्ये नाेकरी लावताे, त्याठिकाणी पैसे भरावयास लागतील, असे सांगितले.
त्यानुसार उमेश धनावडे यांनी ठाणे येथील वर्तकनगरमधील जनता सहकारी बँकेतील राेहित म्हसकर याच्या खात्यावर ६,८६,५६१ रुपये पाठविले. तसेच वाडीतील मित्राच्या माेबाइलवरून राेहित म्हसकर याच्या अभ्युदया काे. ऑप. बँकेच्या खात्यावर ९३,९५० रुपये आणि त्यानंतर दि. १३ मे २०२४ ते दि. १० जून २०२४ या कालावधीत एकूण १ लाख ८७ हजार रुपये पाठविले. त्यानंतर अनाेळखी महिलेने राेहित म्हसकर याच्या खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले असता फिर्यादी यांनी १० हजार रुपये पाठविले.
त्यानंतर पुन्हा समीर म्हस्के याने फाेन करून पैसे पाठविण्यास सांगितल्याने १ लाख ६२ हजार रुपये पाठविण्यात आले. नाेकरीच्या आमिषाने तब्बल ११ लाख ३९ हजार ५११ रुपये देण्यात आले. मात्र, तीन वर्षे नाेकरीचा काेणताच पत्ता नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी ग्रामीण रुग्णालयात फिर्याद दिली असता, पाेलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुन्हा फाेन केलास तर बघून घेईन
आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी उमेश धनावडे यांनी समीर म्हस्के याच्याकडे विश्वासाने पाठविलेले पैसे परत मागितले. त्यावर त्याने ‘मी देणार नाही, पुन्हा फाेन केलास तर बघून घेईन,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.