Ratnagiri: देवरुखातील सुवर्णकाराच्या अपहरणप्रकरणी चौघांच्या मुसक्या आवळल्या, मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:59 IST2025-09-25T13:58:02+5:302025-09-25T13:59:12+5:30
बदलापूर आणि पनवेल येथून या चौघांना अटक

Ratnagiri: देवरुखातील सुवर्णकाराच्या अपहरणप्रकरणी चौघांच्या मुसक्या आवळल्या, मुद्देमाल जप्त
रत्नागिरी : देवरुखातील सुवर्णकार धनंजय केतकर यांच्या अपहर आणि लूट प्रकरणात कुठलेही स्पष्ट धागेदोरे नसताना केवळ तांत्रिक दृष्ट्या तपास करत पोलिसांनी चार संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. बदलापूर आणि पनवेल येथून या चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पावणेसात लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. या संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
दीपक राजेश लोहिरे (३७, रा. बदलापूर, ठाणे), विशाल मनोहर आचार्य (४५, रा. आपटेवाडी बदलापूर, ठाणे) यांना बदलापूरहून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख १ लाख ६० हजार रुपये जप्त करण्यात आले. पनवेल येथून प्रणित संजय दुधाणे (३०) आणि राजेश अनंत नवाले (३५, दोन्ही रा. भडकंबा पेटवाडी, ता. संगमेश्वर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून मोबाइल, कार असा ५ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
धनंजय केतकर बुधवार दि. १७ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता साखरप्याहून देवरूखकडे येत होते. त्यावेळी साखरपा ते देवरूख जाणाऱ्या रस्त्यावर वांझोळे गावाजवळ एक पांढरी गाडी त्यांच्या गाडीला घासून पुढे उभी राहिली. त्यातील संशयितांनी केतकर यांना जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवून त्यांच्या गळ्यातील ३ चेन आणि रोख २० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर केतकर यांना एका ठिकाणी नेऊन दुसऱ्या गाडीत बसवले. त्या गाडीतील संशयितांनी ५ लाखांच्या खंडणीची मागणी केली. मात्र नंतर वाटूळ येथे पुलाखाली सोडले. गस्त घालणाऱ्या राजापूर पोलिसांना ते जखमी अवस्थेत सापडले. त्यांनीच केतकर यांना देवरूखला सोडले.
पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने वेगवेगळी पथके रवाना करण्याबाबत सूचना दिल्या. अतिरिक्त पोलिस अधिक्षक बी. बी. महामुनी यांनीही घटनास्थळी भेट देउन तपासाबाबत मार्गदर्शन करत संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना होती. या दोन्ही अधिकाऱ्यांसह लांजा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, देवरूख पोलिस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे, तसेच उपनिरीक्षक संदीप ओगले, प्रशांत बोरकर, सहायक पोलिस फौजदार पांडुरंग गोरे, सुभाष भागणे, हवालदार नितीन डोमणे, विनायक राजवैध, विक्रम पाटील, गणेश सावंत, योगेश नार्वेकर, प्रवीण खांबे, विवेक रसाळ, योगेश शेट्ये, रमिज शेख, शांताराम झोरे, बाळू पालकर, विजय आंबेकर, सत्यजित दरेकर, दीपराज पाटील, अमित कदम, भैरवनाथ सवाईराम, विनोद कदम, पोलिस शिपाई अतुल कांबळे, महिला कॉन्स्टेबल शीतल पिंजरे, चालक पोलिस नाईक दत्ता कांबळे आणि नीलेश शेलार या तपास कामात सहभागी झाले होते.
सीसीटीव्हीची मदत
या तपासात तांत्रिक अंगाने अधिक तपास करण्यात आला. अपहरण करणाऱ्यांच्या गाड्या शोधण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्हीची मोठी मदत झाली आहे.