ठरलं! वैभव खेडेकर यांचा गुरुवारी भाजप प्रवेश, मंत्री नितेश राणे यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:11 IST2025-09-02T13:11:11+5:302025-09-02T13:11:39+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणातील चौघा नेत्यांना मनसेतून बडतर्फ करण्यात आले होते

ठरलं! वैभव खेडेकर यांचा गुरुवारी भाजप प्रवेश, मंत्री नितेश राणे यांची घोषणा
खेड : येथील माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे बडतर्फ नेते वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. ते ४ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करतील आणि मुंबईत प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल, असे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जाहीर केले.
मंत्री राणे यांनी सोमवारी दुपारी १ वाजता खेडला भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. राजवैभव प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक गणपतीला तसेच वैभव खेडेकर यांच्या भडगाव येथील निवासस्थानीही त्यांनी बाप्पांचे दर्शन घेतले.
वैभव खेडेकर यांच्यासह मनसे उपजिल्हा प्रमुख संतोष नलावडे, तालुकाध्यक्ष नीलेश बामणे, सुबोध जाधव, अविनाश सौंदळकर हे पदाधिकारी ४ सप्टेंबर रोजी हाती कमळ घेणार आहेत, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार २५ ऑगस्ट रोजी कोकणातील नेते वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांना मनसेतून बडतर्फ करण्यात आले होते. हा निर्णय मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी जाहीर केला.
या कारवाईनंतर वैभव खेडेकर कोणती राजकीय भूमिका घेणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेले वर्षभर सुरू आहे. मात्र त्याला कोणताही दुजोरी मिळत नव्हता. बडतर्फीनंतर त्या चर्चेला पुन्हा उजाळा मिळाला आणि आता मंत्री राणे यांच्या घोषणानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.