Ratnagiri: मैत्रिणीसाेबत फिरायला गेला, गाेव्यावरून परतताना दोघांत वाद झाला अन् विचित्र अपघातात ५ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 19:30 IST2025-08-20T19:29:06+5:302025-08-20T19:30:14+5:30

सुसाट जीप गाडीने रिक्षाला उडवले

Five people killed in an accident at Pimpli in Chiplun taluka ratnagiri | Ratnagiri: मैत्रिणीसाेबत फिरायला गेला, गाेव्यावरून परतताना दोघांत वाद झाला अन् विचित्र अपघातात ५ ठार

Ratnagiri: मैत्रिणीसाेबत फिरायला गेला, गाेव्यावरून परतताना दोघांत वाद झाला अन् विचित्र अपघातात ५ ठार

चिपळूण (जि. रत्नागिरी) : ‘बचाव.. बचाव..’ म्हणत मैत्रिणीने जीप मधून उडी मारली आणि त्यानंतर पाठलाग होईल म्हणून तिच्या मित्राने जीप गाडी वेगाने पळवली. त्या वेगात त्याने एका रिक्षाला धडक दिली आणि आपल्यासोबत फरफटत नेले. त्याच वेळी समोरून ट्रक आला आणि अपघातग्रस्त रिक्षा जीप आणि ट्रकमध्ये चेपली गेली.

यात रिक्षाचालक, रिक्षातील प्रवासी दाम्पत्य, त्यांचा चार वर्षांचा चिमुकला आणि जीप गाडीचा चालक अशा पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना पिंपळी येथे पुलावर सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण चिपळूण तालुकाच हादरून गेला.

या अपघातात, रिक्षा चालक इब्राहिम इस्माईल लोणे (६२, पिंपळी नुराणी मोहल्ला), जीप चालक आसिफ हाकीमुद्दीन सैफी (२८, डेहराडून, उत्तराखंड), रिक्षातील प्रवासी नियाज महंमद हुसेन सय्यद (५०), शबाना नियाज सय्यद (४०) व हैदर नियाज सय्यद (४, सर्व रा. पर्वती, पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. मृत नियाज व शबाना यांचा मुलगा पिंपळी येथील मदरशामध्ये शिक्षण घेत आहे. त्याला भेटण्यासाठी त्याचे आई-वडील व भाऊ हैदर असे तिघे जण आले होते. त्याची भेट झाल्यानंतर ते पुणे येथे परतीच्या प्रवासाला निघाले होते. सय्यद कुटुंब इब्राहिम लोणे यांच्या रिक्षामधून सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशनकडे जात होते.

त्याचदरम्यान, आसिफ सैफी हा अतिवेगाने जीप चालवत समोरून आला. त्याने रिक्षाला जोरदार धडक देत फरपटत नेले. रिक्षाच्या मागे ट्रक होता. त्यामुळे ती रिक्षा ट्रकवर आदळली आणि काही कळण्याअगोदरच होत्याचे नव्हते झाले. रिक्षातील चालकासह तिन्ही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जीपचालक आसिफ सैफी हाही अपघातात मृत झाला. या अपघातानंतर त्या परिसरात रक्ताचा सडा पडला होता. अपघातग्रस्त जीप ही हरयाणाची आहे. अपघातातील मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मंगळवारी सकाळी ते मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

जीपमधून ‘बचाव.. बचाव..’चा आवाज

पिंपळी येथील अपघातापूर्वी काहीसा नाट्यमय प्रकार जीप गाडीबाबत घडला. थार गाडीतील तरुण बहादूरशेख नाका येथे अभिरुची हॉटेलजवळ आला आणि तेथून पुन्हा गाडी बहादूरशेख नाक्याकडे जाण्यासाठी वळली. त्याचवेळी एका तरुणीने ‘बचाव.. बचाव..’ असा आवाज देत त्या गाडीतून रस्त्यावर उडी मारली. जीपचालक न थांबता कराडच्या दिशेने सुसाट निघाला.

त्या तरुणीने एक गाडी थांबवली. एकाने माझी जीप चोरून नेली असून, तुम्ही त्याचा पाठलाग करा, असे तिने त्या कारचालकाला सांगितले. त्या कारचालकाने तरुणीला गाडीत बसवून पाठलाग सुरू केला; परंतु, जीप चालवणारा पिंपळीच्या दिशेने वेगाने निघून गेला.

तरुणी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकाराची तक्रार देण्यासाठी तो कारचालक तरुणीला घेऊन पोलिस स्थानकाकडे जात होता. मात्र, तरुणीने पोलिसांचे नाव ऐकताच घाबरून त्या गाडीतूनही उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कारचालकाने तिला बहादूरशेख नाका येथे उतरवले. त्यानंतर काही वेळातच पिंपळी येथे थार गाडीचा अपघात घडल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. दरम्यान, संबंधित तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्यांना चिपळुणात बोलावण्यात आले आहे.

गाेव्याला गेले हाेते फिरायला

थार गाडीचा चालक मैत्रिणीसाेबत गाेव्याला फिरण्यासाठी गेला हाेता. गाेव्यावरून परत येत असताना दाेघांमध्ये काेणत्या तरी कारणावरून वाद झाला आणि तिने गाडीतून उतरण्याचा हट्ट धरला. चिपळूणपर्यंत दाेघांमध्ये हा वाद सुरू हाेता. अखेर चिपळूणमध्ये आल्यावर मैत्रिणीने गाडीतून उडी घेतली.

Web Title: Five people killed in an accident at Pimpli in Chiplun taluka ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.