राजकीय पक्षांनी बदलले आपले मित्र, पदवीधर मतदारसंघाचे धूसर चित्र; महायुतीसह आघाडीचीही कसोटी
By मनोज मुळ्ये | Updated: May 15, 2024 12:23 IST2024-05-15T12:19:31+5:302024-05-15T12:23:20+5:30
इच्छुकांची संख्या मोठी, महायुतीसह आघाडीचीही कसोटी

राजकीय पक्षांनी बदलले आपले मित्र, पदवीधर मतदारसंघाचे धूसर चित्र; महायुतीसह आघाडीचीही कसोटी
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे बिगुल वाजले आहेत, मात्र बदललेली राजकीय समीकरणे, युती आणि आघाडीतील बदललेले मित्र, तसेच सरकारी पातळीवरून झालेली पदवीधर मतदार नोंदणी यामुळे आता या निवडणुकीचे चित्रही धूसर झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाकडून इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. त्यामुळे ही निवडणूकही रंगतदार होण्याची शक्यता आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता त्याच्या उमेदवारीबाबतची चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षाकडूनच इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी कोणता पक्ष लढणार आणि मग त्या पक्षाचा उमेदवार कोण असणार, ही जशी राजकीय पक्षांची कसोटी होती, तशीच कसोटी याहीवेळी इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे लागणार आहे.
२५ जून २०१८ रोजी झालेल्या या मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरे यांनी शिवसेनेच्या संजय मोरे यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून) त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर होती.
भाजपची मक्तेदारी
बारा वर्षे वसंतराव पटवर्धन, बारा वर्षे डॉ. अशोक मोडक, सहा वर्षे संजय केळकर अशी सलग ३० वर्षे कोकण पदवीधर मतदारसंघ भाजपकडे होता. या मतदारसंघाच्या २०१२ साली झालेल्या निवडणुकीत भाजपची मक्तेदारी मोडून काढत राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे या मतदारसंघात विजयी झाले. त्यानंतर या मतदारसंघाच्या २०१८ च्या निवडणुकीपूर्वी डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि २५ जून २०१८ रोजी झालेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार म्हणून विजयी झाले.
सरकारी नोंदणींमुळे राजकीय पक्षांचा गोंधळ
आतापर्यंत पदवीधर मतदारसंघातील नोंदणी केवळ राजकीय पक्षच करून घेत होते. त्यामुळे ज्याने मतदार नोंदणी अधिक करून घेतली, त्याला संधी अधिक असे गणित होते. त्या-त्या पदवीधरांशी संपर्कात राहणेही सोयीचे होते, पण यावेळी प्रशासकीय पातळीवरूनही पदवीधरांना आवाहन करून नोंदणी करून घेण्यात आली आहे. या मतदारांपर्यंत पोहोचणे हे उमेदवाराला मोठे आव्हान असेल.
सर्वच पक्ष इच्छुक
- या मतदारसंघाचे विद्यमान आमदार म्हणून भाजपकडून निरंजन डावखरे यांचे नाव चर्चेत आहे. विद्यमान आमदार आमचा असल्याने ही जागा आमचीच, अशी भाजपची भूमिका आहे.
- गतवेळी येथे भाजपसमोर शिवसेनेचा उमेदवार होता. ते संजय मोरे आता शिंदेसेनेत आहेत. त्यामुळे महायुतीमधून शिंदेसेना या जागेसाठी दावा करत आहे.
- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा दिला, तरी मनसेने एकही जागा लढवलेली नाही. त्यामुळे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महायुतीने मनसेला संधी द्यावी, अशी मागणीही केली जात आहे.
- महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून या जागेसाठी दावा केला जात आहे. कोकणात उद्धवसेनाच सगळ्या जागा लढत आहे. त्यात काँग्रेसला संधी मिळालेली नाही. त्यामुळे ही जागा काँग्रेसला सोडावी, अशी अपेक्षा केली जात आहे.
- गतवेळी आघाडीकडून राष्ट्रवादीचा उमेदवार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसलाही ही जागा हवी आहे.
- भाजपला टक्कर देत गतवेळी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे महाविकास आघाडीतून उद्धवसेनाही या जागेसाठी इच्छुक आहे. कदाचित उमेदवार तुमचा, पण जागा आमची अशी शक्कल उद्धवसेनेकडून लढवली जाण्याची शक्यता आहे.
ठाण्याचे प्राबल्य
या मतदारसंघातील १ लाख ७७ हजार मतदारांमध्ये ७३ हजारांहून अधिक मतदार ठाणे जिल्ह्यात आहेत. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतही हेच होते. त्यामुळे साहजिकच या जागेसाठी ठाण्यातील उमेदवाराला प्राधान्य दिले जाते. रायगड जिल्ह्यात ४५ हजारांहून अधिक मतदार आहेत. रत्नागिरीत जिल्ह्यात २१ हजारांहून अधिक, तर पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० हजारांपेक्षा कमी मतदार आहेत. पुरवणी मतदार यादी बनवण्याचे काम सुरू असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. ठाणे येथे अधिक मतदार असल्याने सर्वच पक्ष ठाण्यातील उमेदवाराला प्राधान्य देतात.