Ratnagiri: 'दामदुप्पट'च्या आमिषाने फसवणूक; ‘मातृभूमी ग्रुप’चा संचालक चिपळूण पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:48 IST2025-08-11T17:48:17+5:302025-08-11T17:48:50+5:30
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक

Ratnagiri: 'दामदुप्पट'च्या आमिषाने फसवणूक; ‘मातृभूमी ग्रुप’चा संचालक चिपळूण पोलिसांच्या ताब्यात
चिपळूण : येथील नागरिकांची रक्कम दामदुप्पट करून देण्याचे प्रलोभन दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्चा संशयित संचालकाला मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. प्रदीप रवींद्र गर्ग असे त्याचे नाव असून, तो मूळचा मीरारोड येथील राहणारा आहे. त्याला रविवारी चिपळूण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याला न्यायालयासमाेर हजर केल्यानंतर बारा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
त्याने धाराशिव, रत्नागिरी, सोलापूर, हिंगोली, लातूर आणि सातारा या सहा जिल्ह्यांतील हजारो नागरिकांना गुंतवणुकीचे प्रलोभन दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली. यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण येथे २०१९ मध्ये त्याने मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक केली होती.
याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली, मात्र चिपळूण न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. तो जामीन आदेशातील अटी-शर्तींचे पालन करत नव्हता, तसेच न्यायालयासमोर हजरही होत नव्हता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द करून अजामीनपात्र वॉरंट बजावणी करण्याचे आदेश दिले. मात्र, तो फरार झाल्याने सापडत नव्हता.
तो मूळचा मीरा रोडमधील निवासी असल्याने यासंदर्भात पोलिस महासंचालकांनी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तांना त्याचा शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार आयुक्त निकेत कौशिक, उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या आदेशानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविराज कुराडे यांच्या पथकाने शोध घेऊन त्याला उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथून शनिवारी (९ ऑगस्ट) ताब्यात घेतले.