Ratnagiri: बाबा फोन उचलत नाहीत, काका घरी जाऊन बघा; मुलीच्या काळजीमुळे उघडकीस आला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:40 IST2026-01-21T16:39:05+5:302026-01-21T16:40:03+5:30
तीनही मुलींची लग्न, घरात राहत होते एकटेच

संग्रहित छाया
लांजा : ‘बाबा, गेली चार ते पाच दिवस फोन उचलत नाही आहेत. काका घरी जाऊन बघा,’ असे मुलीने फाेनवरून काकांना सांगितले. चुलत काका रात्री बॅटरी घेऊन घरामध्ये बघायला गेला असता मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत हाेती. त्यांनी बॅटरीच्या उजेडात पाहताच रक्ताच्या थाराेळ्यात भाऊ पडलेला पाहून भावाला धक्काच बसला. हा प्रकार तालुक्यातील कुर्णे येथे घडला असून, सुरेश तथा भरत रामचंद्र पड्ये (वय ४५), असे मृतावस्थेत सापडलेल्या प्राैढाचे नाव आहे.
मुंबई येथे असलेल्या दोन नंबरच्या मुलीचा त्यांना कायम फोन असायचाच; पण गेले पाच दिवस वडील फोन उचलत नसल्याने तिच्या जीवाची घालमेल झाली. काळजीपाेटी तिने सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान चुलत काका श्याम पड्ये यांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर ते रात्री ९:४५ वाजता घरी गेले असता घराजवळ माेठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. दरवाजा ढकलून पाहिले असता भाऊ घरात पडलेला हाेता. आजूबाजूला रक्ताचा सडा पाहून भावाला धक्काच बसला. स्वतःला सावरत त्यांनी वाडीतील ग्रामस्थांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह तसेच अनेक ठिकाणी रक्ताचे डाग असल्याने पोलिस पाटील सुनील पड्ये यांना घटनेची माहिती दिली. पोलिस पाटील सुनील पड्ये यांनी लांजा पोलिसांना माहिती दिली. रात्र असल्याने घटनास्थळी पोलिसांना ठेवण्यात आले. मंगळवारी सकाळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलिस उपअधीक्षक राधिका फडके, राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक अमोद सरगंले, उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड, सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन भुजबळराव, हवालदार राजेंद्र कांबळे, जान्हवी मांजरे, नितेश राणे, चालक उमाजी बजागे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. रत्नागिरी फाॅरेन्सिक लॅब मोबाइल व्हॅन, श्वानपथक यांना पाचारण करण्यात आले. लांजा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमोद सरगंले करीत आहेत.
हाताची नस तुटलेली
सुरेश रामचंद्र पड्ये यांच्या डाव्या हातावर वर्मी घाव असल्याने त्यांची हाताची नस तुटलेली हाेती. त्याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे; परंतु त्यांनी स्वतःहून हातावर घाव घातला की, कुणी त्यांच्या हातावर घाव घातला. याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. हा घातपात आहे की, आत्महत्या याचा शाेध पाेलिस घेत आहेत.
तीनही मुलींची लग्न, घरात एकटेच
सुरेश पड्ये यांच्या तीनही मुलींची लग्न झाल्याने ते घरात एकटेच राहत होते. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. आजूबाजूला घरेही नाहीत. त्यातच त्याला दारूचे व्यसन असल्याने तो कधी घरी यायचा, कधी कामावर जायचा याचा कुणालाच थांगपत्ता नसायचा. कामावरून घरी आल्यावर जेवण करून एकटाच घरी झोपायचा.