हॉस्पिटलमधून एक लाखाची चोरी, चोरटा पसार झाला; पोलिसांनी सीसीटीव्ही फुटजेच्या आधारे चार तासांत जेरबंद केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 15:41 IST2026-02-21T15:39:20+5:302026-02-21T15:41:33+5:30
रिक्षा, बस आणि रेल्वेतून पळालेला चोरटा चार तासांत पोलिसांच्या हाती

हॉस्पिटलमधून एक लाखाची चोरी, चोरटा पसार झाला; पोलिसांनी सीसीटीव्ही फुटजेच्या आधारे चार तासांत जेरबंद केला
चिपळूण : हॉस्पिटलच्या काउंटर टेबलाच्या ड्राॅवरमधील एक लाखाची रोकड चोरीला गेली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. आधी रिक्षा, मग बस आणि नंतर रेल्वेतून पळालेला हा चोरटा पोलिसांच्या गतिमान कारवाईमुळे अवघ्या चार तासांतच हाती आला. चित्रपटात शोभावी, अशी ही घटना घडली आहे चिपळूणमध्ये.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
शहरातील मार्कंडी येथील एच.आर.वूमन हॉस्पिटलच्या काउंटर टेबलच्या ड्रॉव्हरमधून एक लाखाची रोकड चोरीस गेल्याची घटना गुरुवारी सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या चोरीप्रकरणी पोलिसांनी तपास गतिमान करून अवघ्या ४ तासांतच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने चोरलेली रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली. त्याला शुकवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
इम्रान अख्तर हुसैन अन्सारी (४१, मुंब्रा-ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास एच.आर.वूमन हॉस्पिटलच्या काऊंटर टेबलच्या ड्रॉव्हरमधून एक लाखाची रोकड अज्ञात चोरट्याने चोरली होती. या चोरीप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ओम आघाव, विकास निकम, हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, संदीप माणके, पोलिस नाईक रोशन पवार, पोलिस शिपाई शैलेश वनगे, रूपेश जोगी या तपास पथकाने यंत्रणा गतिमान केली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरटा ज्या रिक्षामधून गेला होता, त्या रिक्षाचालकाच्या मदतीने चोरट्याचा शोध घेण्यात आला. यावेळी तो चिपळूण बसस्थानकातून खेडच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये बसून गेल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्या एसटी बसच्या वाहकाशी संपर्क साधून चोरटा कोणत्या ठिकाणी उतरला याची माहिती घेतली असता तो खेड रेल्वेस्थानकाच्या ठिकाणी उतरल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी पोलिसांनी खेड रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो चोरटा खेड रेल्वेस्थानकातून पुढे मुंबईकडे दिवा रेल्वेमधून गेल्याचे दिसून आले. दरम्यान, चिपळूण पोलिसांनी दिवा येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने दिवा रेल्वेस्थानकामधून चोरट्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्याच्या चौकशी केली असता संशयित चोरटा हा इम्रान अन्सारी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला अटक करून चोरी केलेली रोख रक्कम जप्त केली.