Ratnagiri: लोटेतील स्फोटप्रकरणी कंपनी मालकासह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, ११ कामगार जखमी, सहा जणांची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:04 IST2026-03-09T13:04:23+5:302026-03-09T13:04:51+5:30
सहा जणांवर नवी मुंबईत उपचार

Ratnagiri: लोटेतील स्फोटप्रकरणी कंपनी मालकासह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, ११ कामगार जखमी, सहा जणांची प्रकृती चिंताजनक
रत्नागिरी : खेड तालुक्यातील लाेटे परशुराम औद्याेगिक वसाहतीतील डाॅक्टर खान इंडस्ट्रीयल कन्सल्टंट कंपनीत झालेल्या स्फाेटप्रकरणी कंपनी मालकासह व्यवस्थापक, प्लांट इन्चार्ज आणि कंपनी व्यवस्थापनातील इतर अधिकाऱ्यांवर खेड पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या स्फोटात ११ कामगार जखमी झाले होते. त्यातील सहाजणांची प्रकृती चिंताजनक आहे.
या दुर्घटनेबाबत जखमी कामगार शिवानंद बाबूराव खाेंडे (वय ३२, सध्या रा. लाेटे धापसेवाडी, खेड, मूळ रा. अहमदपूर, लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ही दुर्घटना शुक्रवारी (६ मार्च) दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली हाेती. या दुर्घटनेप्रकरणी कंपनीचे मालक डाॅ. विखार ऐहमद खान, कंपनी व्यवस्थापक सलीम अब्दुल वासे बिजापुरे, प्लांट इन्चार्ज प्रीतम बाळकृष्ण पाेलेकर यांच्यासह व्यवस्थापनातील अन्य अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीमध्ये इथाइल सिलिकेट रसायन तयार करण्याचे काम सुरू असताना रिॲक्टरचा स्फाेट होऊन ही दुर्घटना घडली होती.
साधन सामुग्री न पुरविल्याचा ठपका
जखमी कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने काेणत्याही प्रकारची साधन सामुग्री (हेल्मेट, गमबुट, सेफ्टीड्रेस, गाॅगल, हॅन्डग्लाेज) पुरवलेली नसल्याचा ठपका कंपनी मालक, व्यवस्थापक, प्लांट इन्चार्ज आणि अन्य अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धाेक्यात आणणारी कृती केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाजणांवर नवी मुंबईत उपचार
या स्फोटात जखमी झालेले नंदकिशोर कृष्णा राणे (वय ४०, रा. दाभिळ - खाेतवाडी, खेड), सुपरवाझर सुजन गाेपाळ दास (२९, रा. आवाशी - माळवाडी, खेड), रघुनाथ खंडू खामकर (५७, रा. मुरडे, खेड), रणजित सुभाष राणे (४०, रा. दाभिळ - खाेतवाडी, खेड), अरमान जुनेद शाह (२९, रा. घाणेखुंट, खेड, मूळ रा. विक्रमगंज, बिहार), असद इमाम उद्दीन खान (४४, रा. पटवर्धन - लाेटे, खेड) यांच्यावर नवी मुंबईतील नॅशनल बर्न रुग्णालयात उपचार सुरू आहेत.