Ratnagiri Crime: डिजिटल अरेस्टची धमकी देत वृद्धाला २२ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:42 IST2025-11-21T17:41:28+5:302025-11-21T17:42:16+5:30
देवरूख पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल

Ratnagiri Crime: डिजिटल अरेस्टची धमकी देत वृद्धाला २२ लाखांचा गंडा
देवरूख : ‘डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया’चे अधिकारी असल्याचे सांगून डिजिटल अरेस्टची धमकी देत आंगवली (ता. संगमेश्वर) येथील एका सेवानिवृत्त व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. तब्बल २२ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी देवरूख पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देवरूख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जनार्दन काशीनाथ अणेराव (७१, रा. ठाणे, मूळ रा. आंगवली, ता. संगमेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:३० ते १० वाजण्याच्या सुमाराला एका अनोळखी क्रमांकावरून अणेराव यांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव आर. के. चौधरी सांगितले आणि आपण ‘डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया, मुंबई’ येथून बोलत असल्याचे भासवले.
तसेच ‘तुम्ही घेतलेल्या सीमकार्ड क्रमांकावरून लोकांना त्रास देत आहात. तसेच पैशांची मागणीही करता अशा तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. या संदर्भात आमच्याकडे एमएच ८०७४/२०२५ या क्रमांकाची तक्रार दाखल आहे, असे सांगितले. तसेच त्यांना तात्काळ अटक करण्याची धमकीही दिली.
या धमकीमुळे घाबरलेल्या फिर्यादींना नंतर जॉर्ज मॅथ्यू नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला आणि त्यांचे सर्व तपशील घेतले. बनावट अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या या सायबर गुन्हेगारांनी कायदेशीर कारवाईची भीती दाखवून वेगवेगळ्या टप्प्यांत त्यांच्याकडून तब्बल २२ लाख २० हजार रुपये ऑनलाइन देण्यास भाग पाडले आणि त्यांची फसवणूक केली.
या सायबर गुन्हेगारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६ (क), ६६ (ड) आणि व्हीएमएस २०२३चे कलम ३१८ (४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक उदय झावरे करत आहेत.