गाडी वळवण्यावरून वाद, कोंडकारूळ येथील मच्छिमार तरुणाचा लोणावळ्यात खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:43 IST2025-05-28T13:43:25+5:302025-05-28T13:43:53+5:30
गुहागर : चारचाकी वाहन वळवताना दुसऱ्याला जागा देण्यावरून झालेल्या वादातून लोणावळा येथे गुहागर तालुक्यातील अडूर कोंडकारुळ गावच्या कमलेश तानाजी ...

गाडी वळवण्यावरून वाद, कोंडकारूळ येथील मच्छिमार तरुणाचा लोणावळ्यात खून
गुहागर : चारचाकी वाहन वळवताना दुसऱ्याला जागा देण्यावरून झालेल्या वादातून लोणावळा येथे गुहागर तालुक्यातील अडूर कोंडकारुळ गावच्या कमलेश तानाजी धोपावकर (४५) याची हत्या करण्यात आली. कमलेशचे अन्य दोन सहकारीही जखमी झाले आहेत. या प्रकरणात लोणावळा पोलिसांनी या घटनेमधील ९ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून चारजणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली.
वादळ सदृश्य परिस्थिती होऊन मच्छीमारी थांबल्याने तालुक्यातील अडूर कोंडकारुळमधील कमलेश तानाजी धोपावकर, आपल्या १६ मित्रांसह एकविरा आईच्या दर्शनाला लोणावळा येथे भाड्याच्या वाहनाने गेले हाेते. देवदर्शन झाल्यानंतर सायंकाळी लोणावळा येथे त्याच ठिकाणी राहायला आलेल्या ४-५ जणांजवळ गाडी वळवण्यावरून त्यांचा वाद झाला. त्यातून कमलेश आणि सहकाऱ्यांना काठ्या व रॉडने मारहाण केली. यामध्ये कमलेशच्या डोक्यावर वर्मी घाव बसला. कमलेशचा सहकारी मनोज वरवाटकरचा (बोटीचा तांडेल) हात जायबंदी झाला तर प्रज्वल मेहताच्या डोक्याला मार लागला.
गंभीर जखमी झालेल्या कमलेश याला तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्याच्या सहकाऱ्यांनी कमलेशचा मृतदेह साेमवारी कोंडकारुळ गावात आणला. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले हाेते. तातडीने प्रत्यक्षदर्शी व सीसीटीव्ही फुटेजद्वारे हल्लेखोरांचे तपशील गोळा केले. त्यानंतर ९ जणांपैकी दोघांना पोलिसांनी २५ मे रोजी लग्नाच्या मांडवातून पोलिसांनी उचलले. उर्वरित पाचजणांचा शोध लोणावळा पोलिस घेत आहेत.
पाचजणांचा शोध सुरु
पाेलिसांनी आत्तापर्यंत निकेश कांबिरे, प्रतीक देशमुख, यश कैलास पडवळ (तिघेही रा. वेहेर गाव तामावळ, लोणावळा ग्रामीण) आणि गौस संजय पट्टाधारी, (रा. तुंगार्ली, लोणावळा) यांना अटक केली आहे. उर्वरित पाचजणांचा शोध लोणावळा पोलिस घेत आहेत.