Ratnagiri: ओव्हरटेक करताना टेम्पो उलटून फरफटत गेला; १ महिला ठार, ७ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 17:15 IST2025-08-14T17:14:33+5:302025-08-14T17:15:07+5:30
स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले

Ratnagiri: ओव्हरटेक करताना टेम्पो उलटून फरफटत गेला; १ महिला ठार, ७ जखमी
राजापूर : तालुक्यातील मिठगवाणे येथील सागरी महामार्गावर झालेल्या टेम्पोच्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, सात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. खासगी आरामबसला ओव्हरटेक करताना टेम्पो सुमारे १०० ते १५० फूट रस्त्याच्या कडेला पलटी मारत फरफटत गेला. बुधवारी (दि.१३) हा अपघात झाला.
वाघ्रण येथील काही महिला टेम्पोतून बागकामासाठी जानशी पठारच्या दिशेने जात होत्या. वाटेत मिठगवाणे येथे आरामबसला ओव्हरटेक करताना टेम्पोचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यात टेम्पो उलटला आणि फरफटत गेला. टेम्पोतील सर्व महिला व एक छोटी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अपघातात टेम्पोचालक आणि केबिनमध्ये असलेले इतर पुरुष प्रवासीही जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच सागरी पोलिस स्थानकाचे पथक पोलिस सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते २० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.