भोस्ते घाटात रसायनाने भरलेला टँकर उलटला, रसायनाची गळती सुरू झाल्याने परिसरात पसरली भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:05 IST2026-03-31T18:05:22+5:302026-03-31T18:05:41+5:30

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गळती नियंत्रणात आणण्यासाठी आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या

A tanker filled with chemicals overturned in Bhoste Ghat, fear spread in the area as the chemical started leaking | भोस्ते घाटात रसायनाने भरलेला टँकर उलटला, रसायनाची गळती सुरू झाल्याने परिसरात पसरली भीती 

भोस्ते घाटात रसायनाने भरलेला टँकर उलटला, रसायनाची गळती सुरू झाल्याने परिसरात पसरली भीती 

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भोस्ते घाटात रसायनाने भरलेला टँकर उलटून अपघात झाल्याची घटना रविवारी (दि. २९) सायंकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. या टँकरमधून रसायनाची गळती सुरू झाल्याने परिसरात भीती पसरली हाेती. खेड नगर परिषदेचा अग्निशमन दल, कंपनीचे सुरक्षा पथक आणि पाेलिसांनी घटनास्थळी दाखल हाेऊन रात्री उशिरा रसायन दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षितपणे हलविल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

भाेस्ते घाटातील वळणावर रसायनाने भरलेला टँकर उलटल्यानंतर त्यातून रसायनाची गळती सुरू झाली होती. त्यामुळे परिसरात वास पसरला होता. तर या भागातील ग्रामस्थांनी वासामुळे श्वसनाचा त्रास हाेत असल्याचे प्रशासनाला कळविले. त्यानंतर खेड येथील पोलिस यंत्रणा, अग्निशमन दल आणि कंपनीचे सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले हाेते.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गळती नियंत्रणात आणण्यासाठी आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या. अग्निशमन दलाने दक्षतेने काम करत गळती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त ठेवून नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, रात्री उशिरा अपघातग्रस्त टँकरमधील रसायन दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षितपणे हलविण्यात आले. ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडण्यात आली. यामुळे संभाव्य धोका मोठ्या प्रमाणात टळला. प्रशासनाच्या तातडीच्या आणि समन्वयित कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्पष्ट झाले.

वाहतूक सुरळीत ठेवण्यात यश

भाेस्ते घाटातील टँकर अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली नाही. योग्य ती खबरदारी घेत वाहतूक सुरळीत ठेवण्यात पाेलिसांना प्रशासनाला यश आले. मात्र, काही काळ या मार्गावरील वाहतूक मंदावली हाेती.

रसायनाची वाहतूक ऐरणीवर

या घटनेनंतर पुन्हा एकदा महामार्गावरून धोकादायक रसायनांची वाहतूक होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हा टँकर लोटे औद्याेगिक वसाहतीतील सध्या वादात सापडलेल्या कंपनीचा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर संबंधित कंपन्यांनी अधिक दक्षता घेऊन अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी हाेत आहे.

Web Title : भोस्ते घाट में रसायन से भरा टैंकर पलटा, रिसाव से दहशत।

Web Summary : मुंबई-गोवा राजमार्ग पर भोस्ते घाट में एक रासायनिक टैंकर पलटने से रिसाव हो गया और दहशत फैल गई। दमकल कर्मियों और पुलिस ने रिसाव को नियंत्रित किया, रसायन को दूसरे टैंकर में स्थानांतरित किया। यातायात बाधित, खतरनाक सामग्री परिवहन पर चिंता।

Web Title : Tanker overturns in Bhoste Ghat, chemical leak sparks fear.

Web Summary : A chemical tanker overturned in Bhoste Ghat on the Mumbai-Goa highway, causing a leak and panic. Firefighters and police contained the leak, transferring the chemical to another tanker. Traffic was briefly disrupted, raising concerns about hazardous material transport.