चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावेळी विद्यार्थ्याच्या अंगावर पडली सळी; शिंदे युवासेना, मनसेकडून रास्तारोको
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 15:19 IST2025-08-04T15:18:31+5:302025-08-04T15:19:58+5:30
मुंबई-गोवा महामार्ग अर्धा तास रोखला

छाया- संदीप बांद्रे
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. डीबीजे महाविद्यालयासमोर एका पिलवरून लोखंडी सळी टाकण्याचे काम सुरू असताना त्यातील एक सळी रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या हातावर पडली. यात विद्यार्थी बालंबाल बचावला असून त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली.
यावेळी संतप्त शिंदे युवासेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको केला. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
गेल्या काही वर्षापासून शहरातील बहादूरशेखनाका ते पाग बौद्धवाडी दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम सुरवातीपासूनच या ना त्या कारणाने वादग्रस्त बनले आहे. दोन वर्षापुर्वी बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलाचे गर्डर कोसळल्याची गंभीर घटना घडली होती. त्यानंतर काही महिन्यातच पिलरवरून दोन कर्मचारी पडून गंभीर जखमी झाले होते. त्यापाठोपाठ सुरक्षितेसाठी पुलाच्या ठिकाणी लावलेली जाळी एका धावत्या ट्रकला अडकली होती. त्यामुळे देखील मोठा धोका निर्माण झाला होता.
याशिवाय सातत्याने या परिसरात किरकोळ व मोठे अपघात आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर संबंधीत ठेकेदार कंपनीला प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना सातत्याने केल्या होत्या. अशातच सोमवारी डीबीजे महाविद्यालयासमोर उड्डाणपुलावर पिलरसाठी टाकण्यात येत असलेली लोखंडी सळी अचानक खाली पडली. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी अथर्व शिंदे याच्यावर पडली. यात त्याच्या हाताला दुखापत झाली. त्याला तत्काळ उपचारासाठी खासगी रूग्णालयात नेण्यात आले.