संशयित महिलेशी सोशल मीडियावर ओळख, गोल्ड ट्रेडिंगच्या आमिषाने गुंतवणूक; रत्नागिरीतील एकाची साडेअकरा लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:51 IST2025-10-06T13:51:31+5:302025-10-06T13:51:46+5:30
कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष

संशयित महिलेशी सोशल मीडियावर ओळख, गोल्ड ट्रेडिंगच्या आमिषाने गुंतवणूक; रत्नागिरीतील एकाची साडेअकरा लाखांची फसवणूक
रत्नागिरी : गोल्ड ट्रेडिंग करून कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एकाची तब्बल ११ लाख ६० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या फसवणुकीप्रकरणी मारिया (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) आणि TRADNGBED कंपनीच्या सर्व अकाउंट होल्डरांवर रत्नागिरी सायबर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्या विरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, फसवणुकीचा हा प्रकार ४ जुलै २०२५ ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत झाला आहे. फिर्यादीची दिशाभूल करून पैसे गुंतवण्यास भाग पाडले. तसेच गुंतवणुकीचा लाभ न देता मूळ गुंतवणुकीच्या रकमेची फिर्यादीने विचारणा केल्यावर कंपनीच्या नियमाप्रमाणे ६ लाख १३ हजार ६४७ रुपये इतकी रक्कम तुम्हाला भरावी लागेल आणि मनी लॉड्रिंग झाल्यामुळे अकाउंट सस्पेक्टेड झाल्यामुळे सर्व रक्कम भरावी लागेल, असे सांगितले.
तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने पैसे भरूनही त्यांना गुंतवणूक केलेल्या रकमेवर कोणताही लाभांश न मिळाल्याने तब्बल ११ लाख ६० हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी फिर्यादीने शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी सायबर पोलिस स्थानकात फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९ (२) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियावर ओळख
फिर्यादीची संशयित महिला मारिया हिच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. तिने फिर्यादीचा विश्वास संपादन करून आपण ट्रेडिंग संदर्भातील सल्लागार असल्याचे भासवले. त्यानंतर गोल्ड ट्रेडिंग करुन कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवून तिने फिर्यादीला व्हॉटसॲपद्वारे लिंक पाठविली. त्यानंतर पैसे घेऊन फसवणूक केली.