परदेशात नोकरीचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक, रत्नागिरीतील प्रकार; अज्ञात महिलेचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 14:07 IST2025-10-04T14:07:13+5:302025-10-04T14:07:38+5:30
प्रवासाचा खर्चही फिर्यादीकडून

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक, रत्नागिरीतील प्रकार; अज्ञात महिलेचा शोध सुरू
रत्नागिरी : परदेशात चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून रत्नागिरी शहरातील एका कुटुंबाची तब्बल २१ लाख २ हजार २५६ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात एका अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणुकीबाबत आयेशाबी इम्रान टेमकर (वय ३२, रा. कीर्तिनगर, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ही फसवणूक ४ सप्टेंबर २०२४ ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत झाली आहे. संशयित महिलेने आयेशाबी यांच्या भावाला तसेच त्यांच्या नात्यातील आणि ओळखीतील इतर लोकांना परदेशात आकर्षक नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
नोकरीच्या नावाखाली संशयित महिलेने स्वत:, तिची भाची आणि बहीण यांच्यामार्फत आयेशाबी यांच्याकडून रोख स्वरूपात आणि ऑनलाइन पद्धतीने पैसे स्वीकारले. आयेशाबी आणि त्यांच्या पतीची एकूण २१ लाख ०२ हजार २५६ रुपयांची फसवणूक केल्याचे समाेर आले आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आयेशाबी टेमकर यांनी दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी फिर्याद दाखल केली. या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३१८ (४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अज्ञात संशयित महिलेचा कसून शोध घेत आहेत.
प्रवासाचा खर्चही फिर्यादीकडून
संशयित आरोपी महिलेच्या सांगण्यावरून आयेशाबी यांना दोनदा मंगळूर आणि एकदा केरळ येथे एकूण २० लोकांना घेऊन जाण्यासाठी लागलेला खर्च करावा लागला. तसेच आयेशाबी यांचे पती यांनाही याच कामासाठी केरळला जाण्याचा खर्च करावा लागला.