सावधान!, रत्नागिरी जिल्ह्यात १८ दिवसांत २२ अपघात, १२ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 18:07 IST2025-05-20T18:06:27+5:302025-05-20T18:07:20+5:30
अर्धवट चौपदरीकरण, वाढलेला वेग कारणीभूत

सावधान!, रत्नागिरी जिल्ह्यात १८ दिवसांत २२ अपघात, १२ जणांचा मृत्यू
रत्नागिरी : वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भरमसाट वाढ होऊ लागली आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावर तसेच रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या अपुऱ्या कामामुळे तसेच वेगात वाहन हाकण्यामुळे अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. गेल्या १८ दिवसांत जिल्ह्यात महामार्ग आणि अंतर्गत मार्गांवर विविध ठिकाणी २२ अपघात झाले. या अपघातांत १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३१ जण जखमी झाले आहेत.
सध्या उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर कोकणात, गोव्यात सुटीचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. मात्र, या दोन्ही महामार्गांवर अर्धवट राहिलेल्या कामांमुळे वाहनचालकांना डोकेदुखी होत आहे. या मार्गांवरून वाहने नेताना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे अवघड वळणात वाहने कलंडण्याच्या घटना घडत असून, यातून जीवघेणे अपघात घडत आहेत.
त्यातच आता रस्ते मोठे झाल्याने या मार्गावरून वेगाने वाहने हाकली जात आहेत. या भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातांत अधिकच भर पडत आहे. सध्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने मार्गांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. १ मेपासून शाळांना सुटी पडल्याने चाकरमानीही मोठ्या प्रमाणावर कोकणातील गावाकडे परतू लागले आहेत. सध्या महिनाभर महामार्गावर गर्दी राहणार आहे.
वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे आणि अति वेगामुळे महामार्गांवर तसेच अंतर्गत रस्त्यांवरही अपघात होऊ लागले आहेत. १ ते १८ मे या १८ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी २२ अपघात झाले. यात १२ जणांचा मृत्यू झाला. किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या १५ आहे तर गंभीर असलेल्यांची संख्या १६ आहे. मृतांमध्ये आता आणखी पाचजणांची दुर्दैवी भर पडली आहे.