रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील २७५ प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या असून, शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतण्याचा धोका निर्माण झाला आहे. धाेकादायक बनलेल्या शाळांच्या इमारतींपैकी २०८ शाळांच्या दुरुस्तीला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३ कोटी ६० लाख २३ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये गरीब तसेच सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात. शाळांची गुणवत्ता सुधारावी, यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचा चांगला परिणामही अलीकडच्या काळात दिसत आहे. मात्र, ज्या शाळेत ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेत आहेत, त्या जिल्हा परिषदेच्या सुमारे २७५ शाळा धोकादायक बनल्या आहेत. त्या शाळांच्या इमारती नादुरुस्त झाल्या आहेत.या शाळांमधून शिक्षण घेणे विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणारे आहे. त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठविण्यास शिक्षकही तयार हाेत नव्हते. या शाळांच्या दुरुस्तीची सातत्याने मागणी हाेत हाेती. या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याने त्या लवकरच दुरुस्त करण्यात येणार आहे.
पालकमंत्र्यांचे विशेष लक्षजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शासनाकडे प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी निधीची मागणी करण्यात आलेली आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालून जिल्हा नियोजनमधून सन २०२४-२५ या वर्षात शाळा दुरुस्तीसाठी ३ कोटी ६० लाख २३ हजार रुपये मंजूर केले आहेत.
आणखी ६७ शाळांची दुरुस्ती आवश्यक
नादुरुस्त शाळांच्या धोकादायक इमारतींमध्ये बसून मुले शिक्षण घेत आहेत, तर काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी शाळा भरवण्यात येत आहेत.धोकादायक ठरणाऱ्या २०८ शाळांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित ६७ शाळांचीही दुरुस्ती हाेणे गरजेचे आहे.
दुरुस्तीसाठी मंजुरी मिळालेल्या शाळातालुका - नादुरुस्त शाळामंडणगड - ०४दापोली - २२खेड - ६३चिपळूण- २५गुहागर - १२संगमेश्वर - २८रत्नागिरी - २२लांजा - ०९राजापूर - २३एकूण - २०८