Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 18:19 IST2025-10-24T18:16:32+5:302025-10-24T18:19:11+5:30
Kota youth beat crocodile viral video: राजस्थानमधील कोटा शहरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली.

Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!
राजस्थानमधील कोटा शहरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली. बोरखेडा पोलीस स्टेशन परिसरातील देवली अरब भागात एका वसाहतीत घुसलेल्या एका मगरीला पकडून काही तरुणांनी तिला मारहाण केली आणि तिच्या तोंडाला पट्टी बांधली. एवढेच नव्हे तर, संबंधित तरुणांनी या जखमी मगरीसोबत फोटो आणि व्हिडीओ काढून तिची थट्टा केली. दरम्यान, अशा वर्तनामुळे केवळ प्राण्यांचा जीव धोक्यात येत नाही. तर, हे मानवांसाठीही धोकादायक ठरू शकते, अशा शब्दांत वन्यप्रेमींनी संताप व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, देवली अरब भागात रात्री उशिरा तीन ते चार फूट लांबीची मगर अचानक वसाहतीत घुसल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखण्याऐवजी काही तरुणांनी मगरीशी अमानुषपणे खेळायला सुरुवात केली. त्यांनी मगरीला काठ्यांनी मारहाण करून जखमी केले. नंतर पकडून तिच्या तोंडाला पट्टी बांधली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, तरुण हसताना आणि विनोद करताना दिसत आहेत. त्यापैकी एक जण 'आता कोणी त्याला मारणार नाही, मला एक-दोन फोटो काढू द्या,' असे म्हणताना ऐकू येतो. मिळालेल्या माहितीनुसार, काही तरूण या मगरीला स्कूटरवरून घेऊन जातानाही दिसले.
जखमी मगरीवर उपचार सुरू वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा मगर जखमी आणि कमकुवत अवस्थेत होती. पथकाने तिला ताब्यात घेतले आणि तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. वन विभागाकडून कठोर कारवाईचे संकेत वन विभागाचे डीएफओ अनुराग भटनागर यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "मगर दिसल्यानंतर लगेचच आम्हाला कळवायला हवे होते, तिला जखमी करणे अत्यंत चुकीचे आहे," असे ते म्हणाले. पुढे त्यांनी स्पष्ट केले की, "व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे आणि त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल."