लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केलाय, काँग्रेसला निरोप देण्याचं ठरवलंय - अमित शाह 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 12:18 PM2023-11-23T12:18:42+5:302023-11-23T12:27:45+5:30

राजस्थानच्या लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. लोकांनी काँग्रेसला निरोप देण्याचे ठरवले आहे, असे अमित शाह म्हणाले.

Rajasthan: Union Home Minister Amit Shah addresses a press conference rajasthan assembly election slam congress and ashok gehlot government, Jaipur | लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केलाय, काँग्रेसला निरोप देण्याचं ठरवलंय - अमित शाह 

लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केलाय, काँग्रेसला निरोप देण्याचं ठरवलंय - अमित शाह 

जयपूर : राजस्थान विधानसभेच्या मतदानाचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राजस्थानमध्ये पुढील सरकार भाजपचे स्थापन होणार आहे. राजस्थानच्या लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. लोकांनी काँग्रेसला निरोप देण्याचे ठरवले आहे, असे अमित शाह म्हणाले.

राजस्थानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. राजस्थानच्या जनतेने प्रत्येक क्षेत्रात अपयशी आणि अपयशी ठरलेल्या काँग्रेस सरकारला निरोप देण्याचे मन बनवले आहे. मी संपूर्ण राजस्थानचा दौरा केला आहे. त्यामुळे मी आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की, राजस्थानमध्ये पुढील सरकार भाजपचेच स्थापन होईल. केंद्रातील भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने राजस्थानमधील कोट्यवधी लाभार्थ्यांना केंद्रीय योजनांचा थेट लाभ पारदर्शक पद्धतीने दिला आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, राजस्थान नेहमीच मोदीजींच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि भाजपला पाठिंबा दिला आहे. राजस्थानच्या जनतेने लोकसभेच्या २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला सर्व जागा देऊन मोदीजींना नेहमीच पाठिंबा दिला आहे, असे अमित शाह म्हणाले. 

याचबरोबर, अमित शाह यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, सालासर येथील राम दरबारावर बुलडोझर चालवण्यात आला. अलवरमधील शिवलिंग ड्रिलिंग मशीनने फोडले. काठुमारमध्ये गोठ्यावर बुलडोझर फिरवला, अशा तुष्टीकरणाची अनेक प्रकरणे राजस्थानमध्ये पाहायला मिळाली आहेत. गेहलोत सरकारमध्ये तुष्टीकरणाचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. गेल्या ५ वर्षांत छाबरा, भिलवाडा, करौली, जोधपूर, चित्तोडगड, नोहर, मेवात, मालपुरा, जयपूर येथे नियोजित दंगली झाल्या. व्होट बँकेच्या राजकारणामुळे गेहलोत सरकारने दंगलखोरांवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असेही अमित शाह म्हणाले.

दरम्यान, राजस्थानमध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये लढल्या जात असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात अनेक राष्ट्रीय व स्थानिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे. परंतु संपूर्ण निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याभोवतीच केंद्रित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही भाजपसाठी राजस्थानसह अन्य राज्यांमध्ये मोठी ताकद मानली जात आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे त्यांनी राबविलेल्या कल्याणकारी योजना आणि गॅरंटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधराराजे यांचे नाव जाहीर केले नसले, तरी सध्या त्यांच्याच नावाची चर्चा राज्यातील मतदारांमध्ये  सुरू आहे.

Web Title: Rajasthan: Union Home Minister Amit Shah addresses a press conference rajasthan assembly election slam congress and ashok gehlot government, Jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.