"मोदींनी माझ्या भविष्याची चिंता करू नये", सचिन पायलट यांचे प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 01:51 PM2023-11-23T13:51:15+5:302023-11-23T13:52:22+5:30

सचिन पायलट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान तथ्यापलीकडचे असल्याचे म्हटले आहे.

rajasthan election congress sachin pilot pm narendra modi rajesh pilot | "मोदींनी माझ्या भविष्याची चिंता करू नये", सचिन पायलट यांचे प्रत्युत्तर 

"मोदींनी माझ्या भविष्याची चिंता करू नये", सचिन पायलट यांचे प्रत्युत्तर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काँग्रेस नेते सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट यांचा उल्लेख करून काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. दरम्यान, काँग्रेसमध्ये कोणी खरे बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला संपवले जाते, असा घणाघाती आरोप नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील भिलवाडा येथील प्रचारसभेत केला होता. तसेच, काँग्रेसमधील कुटुंबासमोर कोणीही काहीही बोलले की, तो संपलाच. एकेकाळी राजेश पायलट यांनी काँग्रेसच्या भल्यासाठी त्यांना आव्हान दिले होते, परंतु त्यांना ते आवडले नाही आणि आज ते त्यांच्या मुलाला त्याची शिक्षा देत आहेत, असे नरेंद्र मोदींनी गांधी कुटुंबाचे नाव न घेता म्हटले होते. यावर आता माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सचिन पायलट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान तथ्यापलीकडचे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, "वास्तविक सत्य हे आहे की, दिवंगत पायलट साहेब इंदिरा गांधींच्या प्रेरणेने लोकसेवेसाठी काँग्रेसमध्ये आले होते. त्यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आणि आयुष्यभर जातीयवादी शक्तींविरुद्ध लढा दिला." याचबरोबर, काँग्रेस पक्ष सचिन पायलट यांना शिक्षा करत असल्याच्या नरेंद्र मोदींच्या दाव्यावर त्यांनी पलटवार केला आहे. "मला वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या वर्तमान आणि भविष्याची चिंता करू नये. माझा पक्ष आणि जनता याची काळजी घेईल. भाजपकडे देशासाठी कोणताही रोडमॅप नाही, त्यामुळे नरेंद्र मोदी महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी अशा गोष्टी बोलत आहेत", असे सचिन पायलट यांनी सांगितले.

दरम्यान, राजेश पायलट यांचा हवाला देत भिलवाडा येथील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेली एक घटना १९९७ ची आहे. त्यावेळी काँग्रेस पक्षाने अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली होती. त्यावेळी पक्षात सीताराम केशरी यांचे खूप कौतुक झाले होते, पण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजेश पायलट यांनी सीताराम केशरी यांना आव्हान दिले होते. त्यांना जिंकणे शक्य नाही हे माहीत असतानाही त्यांनी 'पक्ष वाचवण्याच्या' नावाखाली निवडणूक लढवली होती. यानंतर राजेश पायलट यांनी पक्षाच्या हायकमांडचा पाठिंबा गमावल्याचे बोलले जात होते.

मोदी, गेहलोत आणि वसुंधरा यांचीच चर्चा
राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. राजस्थानमध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये लढल्या जात असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात अनेक राष्ट्रीय व स्थानिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे. परंतु संपूर्ण निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याभोवतीच केंद्रित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही भाजपसाठी राजस्थानसह अन्य राज्यांमध्ये मोठी ताकद मानली जात आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे त्यांनी राबविलेल्या कल्याणकारी योजना आणि गॅरंटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधराराजे यांचे नाव जाहीर केले नसले, तरी सध्या त्यांच्याच नावाची चर्चा राज्यातील मतदारांमध्ये  सुरू आहे.
 

Web Title: rajasthan election congress sachin pilot pm narendra modi rajesh pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.