दक्षिण रायगडसाठी माणगावमध्ये अप्पर जिल्हाधिकारी न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:10 AM2020-02-14T00:10:35+5:302020-02-14T00:10:49+5:30

नागरिकांनी व्यक्त केले समाधान : अलिबागपर्यंतची पायपीट वाचणार

Upper Collector's Court in Mangaon for South Raigad | दक्षिण रायगडसाठी माणगावमध्ये अप्पर जिल्हाधिकारी न्यायालय

दक्षिण रायगडसाठी माणगावमध्ये अप्पर जिल्हाधिकारी न्यायालय

Next

माणगाव : येथे उपजिल्हा न्यायालय यापूर्वीच सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अलिबाग येथे जाण्यासाठी होणारी पायपीट वाचली आहे. आता दक्षिण रायगडमध्ये माणगाव या मध्यवर्ती ठिकाणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे न्यायाधिकरण न्यायालय लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे पक्षकार, वकील व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


दक्षिण रायगडमधील ८ तालुक्यांकरिता जिल्हा न्यायालयाच्या धर्तीवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे न्यायाधिकरण माणगाव येथे सुरू करण्याकरिता खा. सुनील तटकरे यांनी नुकतीच सुतारवाडी (ता. रोहा) येथे बैठक बोलावली होती. या बैठकीत या न्यायाधिकरणाला संमती मिळाली. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकाºयांचे न्यायिक प्रकारणांमधील सुनावणीकरिता महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा, पाली या ८ विभागांअंतर्गत येणाºया माणगाव, श्रीवर्धन, रोहा व महाड येथील ४ उपविभागीय अधिकाºयांच्या निर्णयाविरुद्ध होणाºया अपिलाचे कामकाज माणगाव येथे घेण्याबाबत अप्पर जिल्हाधिकारी भारत शितोळे यांना खा. तटकरे यांनी आदेश दिले.


जिल्ह्यात औद्योगिकीकरण आणि विकास प्रकल्प होत आहेत. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणात भूसंपादन करून शेतकºयांना दुप्पट, चौपट जमिनीचे दर देत आहेत. त्यातील सुमारे ९० टक्के लोकांना आर्थिक मोबदला मिळाला आहे. मात्र कौटुंबिक, भावकी, गावकी व वैयक्तिक वाद असल्याने ही प्रकरणे आर्थिक लाभासाठी प्रांताधिकारी कार्यालयाकडे सुनावणीसाठी येत असतात. त्यामध्ये ९० ते ९५ टक्के निकाल प्रांताधिकारी देत असतात. त्यात बहुतेकांचे समाधान होऊन आर्थिक वाद मिटत असतात. मात्र काही जणांना हा निकाल मान्य नसल्यामुळे ते अलिबाग येथे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात जात होते. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैसा नाहक खर्च होत होता. आता माणगाव येथेच न्यायिक प्रकरणांची सुनावणी होणार आहे.

पाठपुराव्याला यश
माणगाव येथेच न्यायिक प्रकरणाची सुनावणी होणार असल्याने न्यायदान लवकर होईल अशी आशा व्यक्त होत आहे. यासाठी माणगाव वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. महेंद्र मानकर व ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. विनोद घायाळ यांनी पाठपुरावा केला होता. बैठकीला माणगाव तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर, माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे, अ‍ॅड. राजीव साबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Upper Collector's Court in Mangaon for South Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.