"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 11:06 IST2025-11-21T11:02:28+5:302025-11-21T11:06:09+5:30
Sunil Tatkare Latest News: गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्यी शिवसेना यांच्यात राजकीय युद्ध पेटले आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांना लक्ष्य करत असून, आता आमदार महेंद्र दळवी यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबद्दल खळबळजनक दावा केला.

"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Shinde Shiv Sena vs Ajit Pawar NCP Sunil tatkare : "रोह्याचे नाव सुनील तटकरे यांनी बदनाम केलं. त्यांची महाराष्ट्रामध्ये घोटाळेबाज म्हणून ओळख निर्माण झाली आहे. राष्टवादीला लोक कंटाळले आहेत. रोहा तालुक्याचे नाव बदनाम होण्याआधीच या लोकांना हद्दपार करणे काळाची गरज आहे", अशी टीका शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केली. तटकरेंची कमळाच्या दिशेने वाटचाल सुरू असून, लवकरच ते भाजपमध्ये जातील, असा दावा करत त्यांनी खळबळ उडवून दिली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे रायगड जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. विशेषतः शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष शिगेला गेला आहे. शिंदेंचे नेते थेट सुनील तटकरेंवरच हल्ला चढवू लागले आहेत.
धक्का मारणे तटकरेंची संस्कृती
आमदार महेंद्र दळवी म्हणाले, "सुनील तटकरे यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात सर्वांनाच धक्का मारत कारकीर्द उभी केली आहे. धक्का मारणे ही त्यांची संस्कृती आहे. मी तटकरेंवर जे काही आरोप केले आहेत, ते त्रिवार सत्य आहेत. तटकरेंनी आयुष्य चिटिंगच केली आहे. ज्यांच्या हाताखाली त्यांनी काम केलं, त्यालाच त्यांनी फसवलं. त्यांची ही संस्कृती आता बंद केली पाहिजे", असे महेंद्र दळवी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
सुनील तटकरे कमळाच्या दिशेने, लवकरच भाजपत जातील
"तटकरे कुटुंबाचे फोन रात्री ९ वाजताच बंद होतात. त्यांना कोणाचीच पर्वा नसते. त्यांच्यात आता काहीजण सोन्याचा चमचा घेऊन आले आहेत", असे म्हणत आमदार महेंद्र दळवी यांनी अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्यावरही निशाणा साधला.
"सुनील तटकरे हे आता कमळाच्या दिशेने जात आहेत, ते लवकरच भाजपमध्ये जातील. त्यांची इकडची बॅग भरली की ते दिल्ली गाठतात. रोहा तालुक्याचे नाव बदनाम होण्याआधीच या लोकांना हद्दपार करणे काळाची गरज आहे", अशी टीका आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरेंवर केली.