गर्भवती महिला मातृवंदना योजनेच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:53 PM2019-11-18T23:53:21+5:302019-11-18T23:53:32+5:30

ग्रामीण भागात अडचणी; सुधागड आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष

Pregnant women deprived of maternity benefits | गर्भवती महिला मातृवंदना योजनेच्या लाभापासून वंचित

गर्भवती महिला मातृवंदना योजनेच्या लाभापासून वंचित

Next

- विनोद भोईर

पाली : सुधागड तालुक्यात बहुतांश गर्भवती महिला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे समोर आले आहे. पात्र महिलांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावयाचे असते, विवाहितेच्या माहेरच्या आणि सासरच्या नावातील तफावत, आधार लिंक, बँक खात्यात पैसे जमा न होणे, जमा झालेल्या खात्याचा कुठलाही तपशील नसणे, जन्माचा दाखला, नोंदणी क्रमांक अशा अनेक अडचणी योजनेचा लाभ घेताना येत आहेत. तालुक्यातील मंगल दीपक कुंभार यांनी दीड वर्षांपूर्वी या योजनेचा लाभ मिळावा, म्हणून अर्ज केला होता. त्यांच्या खात्यात आरोग्य विभागाकडून पैसे वर्ग झाल्याचे दाखविले जाते. मात्र, त्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नसल्याचे कुंभार यांनी सांगीतले.

आरोग्य विभागातून कुठलाही तपशील मिळत नसल्याने अनेक लाभार्थी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवून वैतागले आहेत. सुधागड तालुक्यात प्रधामंत्री मातृवंदना योजनेंतर्गत १ एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत १९७ महिलांची नोंद झाली आहे. १४४ महिलांना ५ हजार प्रमाणे ७ लाख २० हजार रुपयांचा लाभ लवकरच मिळणार आहे. तर ५३ महिलांसाठी लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे माहिती आरोग्य विभागाने दिली.

गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना सकस आहार घेण्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी, तसेच माता मृत्यू आणि बालमृत्यूच्या दरात घट व्हावी, यासाठी राज्य सरकारद्वारे प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येते.

प्रथमत: गर्भवती महिला व स्तनदा मातांनाच या योजनेंतर्गत पाच हजार रुपये दिले जातात. लाभ द्यावयाच्या रकमेची तीन टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिला एक हजार रुपयांचा हप्ता, मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर दिला जातो. दुसरा दोन हजार रुपयांचा हप्ता किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यानंतर व गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात जमा केला जातो. प्रसूतीनंतर अपत्याची जन्म नोंदणी, बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हेपेटायटिस बी यांसारख्या लसीकरणाचा पहिले खुराक दिल्यानंतर तिसरा हप्ता लाभार्थीच्या खात्यात जमा केला जातो. शासनाची ही योजना महिलांसाठी उपयुक्त असली, तरी ती राबविण्यासाठी व लाभार्थींपर्यंत याबाबत माहिती पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

सुधागडमध्ये मातृवंदना योजनेंतर्गत १ एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत १९७ महिलांची नोंद झाली आहे. १४४ महिलांना ५ हजार प्रमाणे ७ लाख २० हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
प्रथमत: गर्भवती महिला व स्तनदा मातांनाच या योजनेंतर्गत पाच हजार रुपये दिले जातात. लाभ द्यावयाच्या रकमेची तीन टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिला हप्ता एक हजारांचा आहे.

तीन टप्प्यांत हे अनुदान मिळते. ज्या लाभार्थ्यांना ही रक्कम मिळाली नाही, त्यांची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही इथून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवित नाही. ते पैसे वरिष्ठ स्तरवरून लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतात. आम्ही फक्त लाभार्थ्यांची माहिती देतो. याबाबत काही तांत्रिक अडचणी असतील, तर त्या सोडविल्या जातील. ज्यांना लाभ मिळाला नाही, त्यांना लाभ मिळविण्यासाठी पाठपुरावा करू.
- शशिकांत मढवी, तालुका आरोग्य अधिकारी, सुधागड.

Web Title: Pregnant women deprived of maternity benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.