डाक कार्यालयातील आर्थिक व्यवहार ठप्प, बीएसएनएलच्या सेवेचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 02:30 AM2020-01-20T02:30:35+5:302020-01-20T02:30:53+5:30

खासगी बँकांनी पर्यायी इंटरनेट सेवा उपलब्ध करून ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत आहेत. मात्र, सरकारी बँका, पोस्ट कार्यालये बीएसएनएलवरच अवलंबून असल्याने सर्वाधिक इंटरनेट खंडित सेवेचा फटका यांना बसत आहे.

 Financial transaction jam the post office due to BSNL's service problem | डाक कार्यालयातील आर्थिक व्यवहार ठप्प, बीएसएनएलच्या सेवेचा फटका

डाक कार्यालयातील आर्थिक व्यवहार ठप्प, बीएसएनएलच्या सेवेचा फटका

googlenewsNext

- संजय गायकवाड

कर्जत : मागील काही महिन्यांपासून बीएसनलची इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत आहे. आता काही दिवसांपासून तर या समस्येत अधिकच वाढ झाली आहे. याचा फटका बँकिंग आणि पोस्टाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. खासगी बँकांनी पर्यायी इंटरनेट सेवा उपलब्ध करून ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत आहेत. मात्र, सरकारी बँका, पोस्ट कार्यालये बीएसएनएलवरच अवलंबून असल्याने सर्वाधिक इंटरनेट खंडित सेवेचा फटका यांना बसत आहे. परिणामी, विशेष करून कर्जत पोस्टाचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांची एकाच कामासाठी वारंवार हेलपाटे मारून दमछाक होत आहे.

तसेच ज्येष्ठांना दर महिन्याला व्याजाचे मिळणारे पैसेही मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. पोस्ट मास्तर, तसेच अन्य कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता इंटरनेट नाही, सर्व्हर डाउन आम्ही तरी काय करणार, अशी हतबलता दाखवित असमर्थता व्यक्त करतात. नागरिकांचे पोस्टातील काम अडलेले असल्याने बिचाºया नागरिकांना दररोज पोस्टात जाऊन उंबरठे झिझवावे लागत असल्याचे विदारक चित्र कर्जत पोस्ट आॅफिसमध्ये दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यावर संबंधित सरकारी कार्यालयांनी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

खासगी बँका बºया म्हणण्याची वेळ
आर्थिक ठेव ठेवताना खासगी बँकांपेक्षा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सरकारी पोस्ट कार्यालय, बँकांकडे पाहिले जाते. नागरिकांकडून तथा ठेवीदाराकडून त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. मात्र, या अशा इंटरनेटच्या अभावी वारंवार खंडित होणारी सेवा पाहून, तसेच स्वत:चेच हक्काचे पैसे मिळायला लागणारा विलंब पाहून खासगी बँका बºया म्हणण्याची वेळ अशा ठेवीदारांवर आली आहे.

बीएसएनएल कार्यालयाला विचारले की, इंटरनेट वारंवार खंडित का होते? तर ते खोदकामात जेसीबीमुळे केबल तुटल्याचे सांगतात, तर कधी वरूनच प्रॉब्लेम आहे, असे थातूरमातूर उत्तर देतात. या अशा सेवेमुळे पोस्टाची सेवाही कोलमडली आहे. ते ही सर्व्हर डाउन आहे, असे उत्तर देऊन नागरिकांची बोळवण करतात. परिणामी, नागरिकांना काम न होताच हात हलवत परत जावे लागते.
- मिलिंद जोशी, ठेवीदार कर्जत

ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या निवृत्तीनंतर मिळालेले लाखो रुपये याच पोस्टात ठेवून त्यापासून दर महिन्याला मिळणाºया व्याजावर ते आपली उपजीविका भागवतात. मात्र, इंटरनेट अभावी पोस्टात आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने आम्हाला पैसे मिळत नाहीत. आम्हा ज्येष्ठ नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे.
- भीमराव जाधव,
नाना मास्तर नगर, कर्जत

इंटरनेट अभावी नागरिकांची जी गैरसोय होत आहे. त्याची बीएसएनएल आणि पोस्ट कार्यालयानेही त्वरित दखल घेऊन समस्या सोडवावी.
- बळवंत घुमरे, नगरसेवक


 

Web Title:  Financial transaction jam the post office due to BSNL's service problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.