रायगडमध्ये शिंदेसेना एकाकी? जिल्हा परिषदेत युतीसाठी भाजपा-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बोलणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:46 IST2026-01-12T16:46:07+5:302026-01-12T16:46:33+5:30
जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार गट, भाजपा युतीचे संकेत, युतीची बोलणी अंतिम टप्प्यात

रायगडमध्ये शिंदेसेना एकाकी? जिल्हा परिषदेत युतीसाठी भाजपा-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बोलणी
राजेश भोस्तेकर
अलिबाग : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपची युती होणार असल्याचे संकेत खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहेत. चर्चा अंतिम टप्प्यात आली असल्याचे खासदार तटकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिंदेसेनेला बाहेर ठेवून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार गट आणि भाजप यांची युती होऊन जिल्हा परिषदेवर भगवा फडकविणार असे संकेत तटकरे यांनी दिले आहेत.
अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी खासदार सुनील तटकरे सोमवारी १२ जानेवारी रोजी आले होते. बैठक संपल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तटकरे यांना प्रश्न विचारला असता भाजप सोबत चर्चा सुरू असून अंतिम टप्प्यात आली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
नगरपरिषद निवडणुकीपासूनच जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप बरोबर आमची बोलणी सुरू आहे. लवकरच अंतिम टप्प्यात बोलणी आली असून दोन्ही पक्ष एकत्रित जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. नगरपरिषद निवडणुकीत तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपची युती झाली होती. तीनही ठिकाणी युतीने विजय मिळविला आहे.
जिल्ह्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात वाद आहे. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत दोघेही एकमेकाच्या विरोधात लढले होते. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी आम्हाला जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाची साथ नको असे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजप आणि अजित पवार गट हे एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अजित पवार गट, भाजप विरुद्ध शिंदेसेना असा सामना रंगणार आहे.