In the district, the coldest temperatures started to fall, while Shrivardhan dropped the minimum temperature | जिल्ह्यात गुलाबी थंडीची लागली चाहूल, श्रीवर्धनमध्ये किमान तापमानामध्ये घसरण
जिल्ह्यात गुलाबी थंडीची लागली चाहूल, श्रीवर्धनमध्ये किमान तापमानामध्ये घसरण

दिघी : जिल्ह्यातील विविध भागांमध्ये थंडीने जोर धरला असून, श्रीवर्धनमध्ये किमान तापमानामध्ये घसरण होऊ लागली आहे. यंदा दिवाळीत पडणारी थंडी, तापमान बदलामुळे उशिरा जाणवत आहे. आणखी काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
श्रीवर्धन परिसरात सायंकाळच्या वेळेस किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे, वातावरणात बदल होऊन थंडीचे प्रमाण वाढत आहे. हीच परिस्थिती आगामी चार ते पाच दिवस कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे आता सध्या पर्यटन हंगामात दिवेआगर येथे पर्यटकांची वाढ झालेली दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरापासून सर्वच भागांमध्ये तापमान दिवसेंदिवस खाली येत आहे. यावर्षी दिवाळीमध्ये पाऊस असतानाही थंडी नसल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. या महिन्यात दिवसभर ३० अंशांपर्यंत गेलेले तापमान आता सायंकाळी १० ते १५ अंश सेल्सिअसवर आले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून २५ ते २० अंशांदरम्यान तापमान राहू लागले. त्यामुळे अचानक थंडीची लाट आल्याचा अनुभव श्रीवर्धनमधील नागरिक घेत आहेत. मुख्य रस्त्यावर सकाळी ८ वाजेपर्यंत वातावरणात धुके दिसत आहे, तसेच सायंकाळी ६ वाजल्यापासून थंडी वाढत असून, नागरिकांना शाल, मफलर, स्वेटर असे गरम कपडे घालूनच घराबाहेर पडावे लागत आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्यादेखील रोडावली आहे.
> पर्यटनाला येतील ‘अच्छे दिन’- व्यावसायिक
या वेळी जून महिन्यात सुरू झालेला पाऊस पाच महिन्यांच्या कालावधीत नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत अधून-मधून सुरूच होता. परतीचा पाऊस उशिरा सुरूच असतानाच जूनमधील क्यार, महा वादळाचा फटका पर्यटनाला बसला. त्यामुळे पर्यटनाशी निगडित अनेक व्यवसायावर विपरित परिणाम झाल्याचे दिसून आले. मात्र, सध्या गुलाबी हवेचा जोर वाढल्याने दिवेआगर पर्यटनात वाढ होत असून पुढील पर्यटनाला ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त के ली.

Web Title: In the district, the coldest temperatures started to fall, while Shrivardhan dropped the minimum temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.