खासगी व्यक्तीकडून करवून घेतली जातात झेडपीची कामे; सीईओंच्या कारवाईकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:12 IST2025-05-15T12:11:04+5:302025-05-15T12:12:54+5:30
- काम करत असलेला प्रकार सीसीटीव्हीमध्ये झाला कैद

खासगी व्यक्तीकडून करवून घेतली जातात झेडपीची कामे; सीईओंच्या कारवाईकडे लक्ष
पुणे : जिल्हा परिषदेतील अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचे अनेक कारमाने समोर आले आहेत. त्यातच आता आणखी एका कारनाम्याची त्यामध्ये भर पडली आहे. जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी कामावर रुजू असतानादेखील बांधकाम विभागात अनेक उपअभियंता दर्जाचे अधिकारी खासगी व्यक्तीला जिल्हा परिषदेत आणून त्याच्या हातात संगणकाची गोपनीय माहिती देत कर्मचाऱ्यांच्या खुर्चीत बसून काम करून घेत असल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
जिल्हा परिषदेमध्ये यापूर्वीही काही कर्मचाऱ्यांनी डमी नेमून कार्यालयामध्ये आणि दप्तर घरी नेऊनदेखील खासगी व्यक्तीकडून काम करून घेण्याचे प्रकार घडले आहेत. सद्यःस्थितीत काही कमी लोक काम करत आहेत, असे असताना देखील आता उप अभियंता दर्जाचे अधिकारीदेखील तालुक्यामधून जिल्हा परिषदेत येताना खासगी ठेकेदारांच्या व्यक्तींना बरोबर
आणून चक्क जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या खुर्चीत बसून कामे करून घेत आहेत. मुळशी तालुक्यातील उपअभियंता बाळासाहेब सायंबर यांनी गेल्या आठवड्यात हा प्रताप केला. विशेष म्हणजे अशा खासगी व्यक्तीच्या हातात संगणक देऊन संगणकीय की देऊन गोपनीय पासवर्ड याची माहितीदेखील याच खासगी व्यक्तींकडून संगणकीय कामकाजामध्ये वापरली जाते.
अभियंता बाळासाहेब सायंबर यांनी याच पद्धतीने मुळशी तालुक्यातील ठेकेदाराकडे काम करणाऱ्या एका खासगी व्यक्तीकडून जिल्हा परिषदेत काही तास काम करून घेतले. काही रजिस्टर समोर मांडून त्याची माहिती संगणकामध्ये खासगी व्यक्ती भरत होती. काही बिलेदेखील अशाच पद्धतीने पास केल्याची माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.