झेडपीच्या कर्मचाऱ्याचा प्रताप; खोटा शिक्का मारून भरले चलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:07 IST2025-01-25T15:03:50+5:302025-01-25T15:07:27+5:30

बांधकाम विभागाकडे ठेकेदारांनी बँकेमध्ये चलनाद्वारे भरलेले पैसे त्यानंतर सही शिक्का असलेली चलने यांची आता बँकेकडे पडताळणी केली जाणार

ZP employee arrogance Paid the bill with a fake stamp | झेडपीच्या कर्मचाऱ्याचा प्रताप; खोटा शिक्का मारून भरले चलन

झेडपीच्या कर्मचाऱ्याचा प्रताप; खोटा शिक्का मारून भरले चलन

पुणे :जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. आता तर ठेकेदाराचे चलन एका शिपायाने बँकेत न भरता पैसे भरल्याचा बँकेचा बनावट शिक्का मारून ते चलन बांधकाम विभागामध्ये जमा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित शिपाई कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषदेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

निविदा मंजूर झाल्यानंतर त्याची अनामत रक्कम ही जिल्हा परिषदेकडून देण्यात येणाऱ्या चलनाद्वारे ठेकेदार ती रोखीने बँकेत भरतो. उत्तर बांधकाम विभागामध्ये कार्यरत असलेला शिपाई हा ठेकेदारांशी संगनमत करून काही कामे करून देतो. ठेकेदार देखील त्यांची काही पैशाची कामे शिपाई मार्फत करतात. बँकेमध्ये चलन भरण्यासाठी संबंधित चलन आणि रोखीचे पैसे या शिपायाकडे एका ठेकेदाराने दिले होते. मात्र हे पैसे प्रत्यक्ष बँकेत न भरता या शिपायाने बँकेचा सही-शिक्का संबंधित चलनावर मारून ते चलन परस्पर बांधकाम विभागाच्या फाईलमध्ये जोडून दिले. काहींच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर संबंधित ठेकेदाराला याबाबत विचारणा करण्यात आली.

त्यानंतर शिपायानेच हा प्रताप केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी संबंधित शिपायाला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच कार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष बोलवूनदेखील विचारणा केली. बांधकाम विभागाकडे ठेकेदारांनी बँकेमध्ये चलनाद्वारे भरलेले पैसे त्यानंतर सही शिक्का असलेली चलने यांची आता बँकेकडे पडताळणी केली जाणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी सांगितले.

‘बांधकाम’ला आवरण्याचे सीईओंपुढे आव्हान

हा एक प्रकार उघडकीस आला असला तरी आतापर्यंत हजारोंच्या संख्येने चलने दिली जातात. बँकेमध्ये अनामत रक्कम भरली जाते. त्यामुळे पैसे भरल्याचा बँकेचा बनावट शिक्का मारून जिल्हा परिषदेकडे आतपर्यंत किती चलने जमा केली किंवा कसे, हा असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील काही ठेकेदार बांधकाम विभागाचा कारभार चालवत असल्याचे चित्र जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळत आहे. जिल्हा दिव्यांग केंद्रचे बांधकाम करताना मंजूर कामापेक्षा अधिक काम ठेकेदाराने केले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील काम त्याच ठेकेदाराला कसे मिळेल, याची व्यूहरचनादेखील काही अधिकाऱ्यांनी केली आणि ती यशस्वीही झाली. त्यामुळे नुकताच पदभार स्वीकारलेले मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासमोर ठेकेदारांबरोबरच बांधकाम विभागाला आवरण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Web Title: ZP employee arrogance Paid the bill with a fake stamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.