पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पण निवडणुकीमध्ये घड्याळाचेच चिन्ह वापरण्याबाबत एकमत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान भाजपनेही शिंदेसेनेबरोबर संधान साधत जागांसाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. सोमवार दिवस राजीनामा, पक्षप्रवेश, नाराजांची समजूत काढण्यामध्येच गेला.
जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा होती मात्र, आता त्याला मूर्त स्वरूप येऊ लागले आहे. शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेत शिरूर लोकसभेतील आंबेगाव तालुका वगळता इतर ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन घड्याळ या एकाच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. इतकेच नाही तर शिरूर आणि खेडमध्ये एकमेकांची समजूत काढण्याचे काम सुरू आहे. उद्या (दि. २०) दुपारपर्यंत मनोमिलनावर शिक्कामोर्तब होऊन यादीही जाहीर केली जाणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी छातीठोकपणे सांगितले खरे. दुसरीकडे मात्र, नाराजांच्या संख्येत वाढ झाली आहे.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील हे राष्ट्रवादीत दाखल झाले. माजी आमदार पोपटराव गावडे यांचे पुत्र राजेंद्र गावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली. तर माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, अशोक पवार यांसह अन्य महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यातच दिवस गेला.
शिंदेसेनेने साधली संधी
दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनानंतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाल्याचे पहायला मिळत आहे. खास करून उत्तर पुण्यात याचे चित्र अधिक स्पष्टपणे दिसत आहे. या संधीचा फायदा उचलत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून बाहेर पडलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी यापूर्वी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यापाठोपाठ उद्धवसेनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली खंडागळे हे देखील हातात धनुष्यबाण घेण्याच्या तयारीत आहेत. जुन्नरमध्ये महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी झाल्यामुळे उमेदवारीची शक्यता धूसर झाली. शिवाय त्यांना विचारातही घेतले नसल्याची चर्चा असून ते लवकरच शिंदे गटात सहभागी होणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनामुळे दुरावले गेलेल्यांना शिंदेसेनेत घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
Web Summary : Zilla Parishad election heats up in Pune. NCP factions aim to unite under the clock symbol, while BJP woos Shinde's Sena. Resignations and attempts to placate dissent mark a busy day as political realignments intensify.
Web Summary : पुणे में जिला परिषद चुनाव तेज। एनसीपी गुट घड़ी चिन्ह के तहत एकजुट होने का लक्ष्य, भाजपा ने शिंदे सेना को साधा। इस्तीफे और असंतोष को शांत करने के प्रयासों के साथ व्यस्त दिन, राजनीतिक पुनर्गठन तेज।