‘तू आता आमच्यात बसत उठत नाही', पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकावर मित्रांनीच तीक्ष्ण हत्याराने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 21:10 IST2025-09-13T21:09:53+5:302025-09-13T21:10:58+5:30

आपल्याला कोणतेही व्यसन लागू नये, यासाठी तो व्यसनाचा नाद करणाऱ्या मित्रांना भेटत नव्हता, या कारणावरुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला

You're not sitting with us anymore a young man preparing for police recruitment was attacked with a sharp weapon by his friends | ‘तू आता आमच्यात बसत उठत नाही', पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकावर मित्रांनीच तीक्ष्ण हत्याराने केले वार

‘तू आता आमच्यात बसत उठत नाही', पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकावर मित्रांनीच तीक्ष्ण हत्याराने केले वार

पुणे : १९ वर्षीय युवक पोलिस भरतीची तयारी करत आहे. त्यामुळे कोणतेही व्यसन आपल्याला लागू नये, यासाठी तो व्यसनाचा नाद करणाऱ्या मित्रांना भेटत नव्हता. या कारणावरून चौघांनी युवकावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. प्रथमेश चिंटू आढळ (१९, रा. साईनिवास, कोंढवे -धावडे, एनडीए रोड) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत प्रथमेश आढळ याच्या दोन्ही हातांना गंभीर जखम झाली असून शनिवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. उत्तमनगर पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची फिर्याद घेतली आहे. ही घटना उत्तमन गरमधील एका वाईन शॉपजवळ ११ सप्टेंब रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेशचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो सध्या पोलिस भरतीची तयारी करत आहे. आरोपींपैकी दोघे प्रथमेशचे मित्र आहेत. त्यातील एकावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. तसेच त्यांना व्यसनाचा नाद आहे. त्यांच्याबरोबर राहिल्यास आपल्यालाही व्यसन लागू शकते, त्यांच्याबरोबर राहिल्यास गुन्हा दाखल झाला तर पोलिस भरतीला अडथळा येईल, असे वाटत असल्याने प्रथमेश हा त्यांना भेटण्यास काही दिवसांपासून टाळत होता. त्यातील एकाने प्रशमेशला तु आता आमच्यात येत नाहीस, असे बोलून ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी कॉल करुन परिसरातील एका वाईन शॉपजवळ भेटायला बोलवले. आपल्यामध्ये गैरसमज झाले असून ते आपापसात मिटवून घेऊ असे त्याला सांगितले. त्यामुळे प्रथमेश रात्री आठच्या सुमारास त्यांना भेटायला गेला. त्यावेळी तेथे त्याच्या ओळखीच्या दोघांसह अन्य दोघे उपस्थित होते. त्यांनी प्रथमेश याला ‘तू आता आमच्यात बसत उठत नाही, तू आता मोठा माणूस झाला आहे,’ असे बोलण्यास सुरूवात केली. त्यावेळी एकाने प्रथमेशची कॉलर पकडली. ‘याला जास्त बोलू नका, याला सोडायचे नाही, याला खल्लास करायचे,’ असे म्हणून आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने लोखंडी धारदार हत्याराने जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रथमेश याने हात मध्ये घातला. त्याने दोन्ही हातावर तीन -चार वार केले. त्यात प्रथमेश गंभीर जखमी होऊन खाली पडला. तेव्हा त्यांनी हातातील शस्त्रे हवेत फिरवून ‘आम्ही येथील भाई असून आमच्या नादाला कोणी लागायचे नाही. कोणी मध्ये आला तर त्याला सोडणार नाही,’ असे म्हणून दहशत निर्माण केली. त्यानंतर प्रथमेशच्या नातेवाईकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असून तेथे त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी दिली.

Web Title: You're not sitting with us anymore a young man preparing for police recruitment was attacked with a sharp weapon by his friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.