बदनामीकारक पत्रके वाटून तरुणीचे लग्न मोडले; बदनामी थांबवण्यासाठी १५ लाख मागितले

By नितीश गोवंडे | Updated: February 14, 2025 18:44 IST2025-02-14T18:35:25+5:302025-02-14T18:44:48+5:30

तरुणीच्या आई-वडिलांचे फोटो छापून बदनामीकारक पत्रके तयार करून वाटल्याने तरुणीचे लग्नही मोडले

young woman marriage was broken by distributing defamatory leaflets 15 lakhs demanded to stop defamation | बदनामीकारक पत्रके वाटून तरुणीचे लग्न मोडले; बदनामी थांबवण्यासाठी १५ लाख मागितले

बदनामीकारक पत्रके वाटून तरुणीचे लग्न मोडले; बदनामी थांबवण्यासाठी १५ लाख मागितले

पुणे: कुटुंबाविषयी बदनामीकारक मजकूर असलेली पत्रके वाटली. मुलाच्या घरातील लोकांना दुसरे पत्रक पाठवल्याने तरुणीचे ठरलेले लग्न मोडले. बदनामी थांबवायची असेल तर १५ लाख रुपये द्या, अशी खंडणीची मागणी केली. ही बाब कोणाला सांगितली तर घरातील मुलीच्या चेहऱ्यावर अश्लील व्हिडीओवर लावून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत आळंदी रोड येथील एका ४२ वर्षांच्या भावाने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी जाहीद जाकी शेख (रा. ससाणेवाडा, भवानी पेठ) आणि २ अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कॅम्पमधील चोक्सी शाळेजवळील आयकॉन ऐव्हेन्यू येथे १७ जानेवारी व ८ फेब्रुवारी रोजी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कॅम्पमधील महात्मा गांधी रोडवर दुकान आहे. त्यांच्या बहिणीचे लग्न ठरले होते. कॅम्पमधील एका धार्मिक ठिकाणी १७ जानेवारी रोजी छापील पत्रके वाटण्यात आली. फिर्यादी यांच्या मित्रांनी ते पत्रक आणून दिले. त्यावर फिर्यादी यांच्या आई-वडिलांचे फोटो छापून बदनामीकारक मजकूर लिहिला होता. त्यांच्या बहिणीचा साखरपुडा २५ जानेवारी रोजी ठरवण्यात आला होता. त्याच्या आधल्या दिवशी फिर्यादी यांचे आईवडील आणि बहिणीविषयी बदनामीकारक मजकूर लिहिलेले पत्रक बहिणीच्या भावी पतीकडे पाठवण्यात आले. हे पत्रक वाचून त्यांनी बहिणीचे लग्न मोडले. त्यामुळे फिर्यादी यांच्या बहिणीला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

त्यानंतर काही दिवसांनी फिर्यादी यांच्या मित्राला तोंडाला मास्क लावलेल्या व्यक्तीने गाठले. त्याने सांगितले की, फिर्यादी यांची बदनामी थांबवायची असेल तर जाहिद शेख याला भेट असे म्हणून निघून गेला. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी फिर्यादी जाहिद शेख याला भेटले असता त्याने बदनामी थांबवायची असेल तर आम्हाला १५ लाख रुपये दे. जर पैसे दिले नाही तर घरातील मुलींच्या फोटोवरून अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करेन, अशी धमकी दिली. इतके पैसे देण्याची ऐपत नसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक हनुमंत तरटे पुढील तपास करत आहेत.

Web Title: young woman marriage was broken by distributing defamatory leaflets 15 lakhs demanded to stop defamation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.