अवघ्या १५ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा नवले पुलाजवळील अपघातात दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 18:17 IST2021-12-28T18:17:25+5:302021-12-28T18:17:49+5:30
कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो वेगात पाठीमागे गेला आणि काही वाहनांना जाऊन धडकला

अवघ्या १५ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा नवले पुलाजवळील अपघातात दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुण्यातील मुंबई-बंगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो वेगात पाठीमागे गेला आणि काही वाहनांना जाऊन धडकला. यामध्ये रस्त्यावर उभ्या असणाऱ्या तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात मृत्युमुखी पडलेल्यामध्ये एक होता चेतन सोळंकी.
चेतन सोलंकी मूळचा धुळ्याचा आहे. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. नव्या नवरीला घेऊन तो पाच दिवसांपूर्वीच पुणे शहरात राहायला आला होता. पुण्यातीलच एका कंपनीत तो काम करायचा. दररोज प्रमाणे आजही सकाळी तो कंपनीत जाण्यासाठी निघाला होता. गाडीची वाट पाहत होतो मुंबई बंगळूर महामार्गावर उभा होता. परंतु त्याची कंपनीची गाडी येण्याआधीच ब्रेक फेल झालेला हा कंटेनर काळ बनून त्याच्या अंगावर आला. या दुर्दैवी अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
चेतनच्या कुटुंबियांना जेव्हा अपघाताची बातमी समजली तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्याचे नातेवाईक ससून रुग्णालयात त्याला पाहण्यासाठी गेले होते. मृतदेहाचे दोन तुकडे झालेल्या चेतनला ओळखणेही त्यांना कठीण होऊन बसले होते. चेतनच्या पश्चात दोन बहिणी आहेत. एका बहिणीचं लग्न झालंय तर दुसरीचं अजून व्हायचंय. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा भार हा चेतन वरच होता. त्याच्या नातेवाईकांना अजूनही चेतनच्या पत्नीला काय सांगावं हे समजत नाहीये.
अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पळून गेला. सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.