पत्नीच्या आणि सासूच्या त्रासामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 13:58 IST2025-09-22T13:58:08+5:302025-09-22T13:58:31+5:30
विवाहानंतर पत्नी आणि सासूने तरुणाला आई-वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी त्याच्यावर दबाब आणला होता

पत्नीच्या आणि सासूच्या त्रासामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
पुणे : पत्नीच्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नीसह तिच्या आईविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय विजय साळवे (२६, रा. गणेशनगर, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी दीपाली अक्षय साळवे (२४), तिची आई संगीता अशोक अडागळे (रा. भगवाननगर, गेवराई, जि. बीड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अक्षय याची आई लक्ष्मी विजय साळवे (५२) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयचा दीपालीशी सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर दीपाली आणि तिची आई संगीता यांनी अक्षयला आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास सांगितले. वेगळे राहण्यासाठी त्याच्यावर दबाब आणला. त्याच्याविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या. पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे अक्षयने १९ सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे मुलगा अक्षयने आत्महत्या केल्याचे त्याची आई लक्ष्मी साळवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक दळवी पुढील तपास करत आहेत.