‘लिव्ह इन’ला तरुण पिढीचे प्राधान्य; मात्र किरकोळ वादातून थेट खून, सुरक्षिततेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 15:23 IST2025-11-22T15:22:37+5:302025-11-22T15:23:37+5:30
लिव्ह इनचा वाढता कल हे समाजातील बदलत्या मूल्यांचे लक्षण असले तरी सुरक्षा, कायदेशीर स्पष्टता आणि सामाजिक स्वीकारार्हता या मुद्द्यांवर ठोस धोरणांची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले

‘लिव्ह इन’ला तरुण पिढीचे प्राधान्य; मात्र किरकोळ वादातून थेट खून, सुरक्षिततेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह!
नम्रता फडणीस
पुणे : उच्च शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि स्वातंत्र्यपूर्ण जीवनशैलीच्या ओढीमुळे सध्या तरुण पिढीत लिव्ह-इन रिलेशनशिपचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दोघांनी एकमेकांना समजून घेणे, करिअर आणि व्यक्तिगत आयुष्याचा समतोल राखणे, पारंपरिक बंधनांपासून दूर राहून नात्याला तपासून घेण्यासाठी लिव्ह इनच्या नात्याला प्राधान्य देत आहेत. परंतु, लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सहकाऱ्याला किरकोळ वादातून मारहाण करणे, खून करणे या घटनाही दुसऱ्या बाजूला वाढत असल्यामुळे लिव्ह इनमधील नात्यात सुरक्षिततेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नुकत्याच येरवडा परिसरात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा किरकोळ मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यातून लिव्ह इनमधील नात्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत विवाहपूर्व सहजीवन ही संकल्पना मर्यादित आणि सामाजिकदृष्ट्या अप्रिय मानली जात होती. मात्र, आज महानगरांपासून उपनगरांपर्यंत अनेक तरुण जोडपी विवाहापूर्वी एकत्र राहण्याचा पर्याय स्वीकारताना दिसतात. मात्र, अशा प्रकारच्या सहजीवनाच्या स्वरूपाबाबत अनेक बाजू अजूनही अस्पष्ट आहेत. समाजातील स्वीकारार्हता कमी असल्याने अनेक जोडप्यांना वैयक्तिक आयुष्य लपवावे लागते. विवाहसंस्थेपेक्षा लिव्ह–इनमध्ये सामाजिक आणि कौटुंबिक पाठबळ कमी असते. त्यामुळे नात्यातील तणाव वाढल्यास किंवा मतभेद निर्माण झाल्यास महिलांना असुरक्षित परिस्थितीला सामोरे जावे लागते. नात्यातील स्थिरता, निष्ठा आणि दीर्घकालीन जबाबदाऱ्या यांचा अभावही अनेकदा वाद किंवा हिंसाचाराला कारणीभूत ठरत असल्याची वस्तुस्थिती पाहायला मिळते. लिव्ह इनचा वाढता कल हे समाजातील बदलत्या मूल्यांचे लक्षण असले तरी सुरक्षा, कायदेशीर स्पष्टता आणि सामाजिक स्वीकारार्हता या मुद्द्यांवर ठोस धोरणांची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
आजच्या स्थितीत मुक्तपणे जीवन जगण्याला तरुणाई प्राधान्य देत आहे. लिव्ह इन ही त्याचीच परिणती असून, हा बदल पुढील काळात अधिक व्यापक होणार आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य, परस्पर सहमती आणि आधुनिक जीवनशैली यामुळे सहजीवनाचा मार्ग अनेकांना सोयीस्कर वाटत आहे. - ॲड. गायत्री कांबळेलिव्ह इनमध्ये महिलेला जोडीदाराबद्दल संपूर्ण माहिती असणे अत्यावश्यक आहे. अनेकदा पुरुष निष्ठावान नसतात किंवा त्यांचा स्वभाव परस्पर आयुष्याशी विसंगत ठरतो. विवाहसंस्थेत सामाजिक मान्यता, नातेवाईकांची उपस्थिती आणि कायदेशीर चौकट असते; परंतु लिव्ह-इनमध्ये त्याचा अभाव असल्याने ‘एन्ट्री–एक्झिट’ सहज शक्य होते. बंधन नसल्यामुळे काही वेळा मारहाण, अत्याचार किंवा गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडतात. महिलांना कौटुंबिक हिंसाचार कायद्याचे संरक्षण मिळते, परंतु प्रथम नाते अस्तित्वात होते हे सिद्ध करावे लागते. त्यामुळे लिव्ह-इन नात्यात राहणाऱ्या महिलांनी कायदेशीर जागरूकता ठेवणे आवश्यक आहे. - ॲड. नीता भवर
देशात लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटना
* १८ मे २०२२ - दिल्लीत आफताब अमीन पूनावाला याने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वाळकरची निर्घृणपणे हत्या केली. आफताबने श्रद्धाचे ३५ तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर दिल्लीच्या जंगलात आणि इतर ठिकाणी फेकून दिले.
* १८ ऑगस्ट २०२३ - नाशिकमध्ये घरगुती किरकोळ वादातून तरुणाने प्रेयसीच्या पाठीत खंजीर खुपसून केली हत्या. सात वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते.
* १४ नोव्हेंबर २०२५ - पुण्यातील येरवडा परिसरात राहणाऱ्या महिलेचा किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. मृत आणि आरोपी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते.