उरुळी कांचन: जुन्या शेती वादातून आणि सामाईक नदीवरील मोटार दुरुस्तीच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुण शेतकऱ्याचा कारने धडक देत खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २) दुपारी साडेतीनच्या सुमारास भवरापूर हद्दीतील साठे वस्ती येथे घडली. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटकेची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत उरुळी कांचन पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश लक्ष्मण साठे (वय 32, रा. भवरापूर, ता. हवेली) असे मृताचे नाव आहे. फिर्यादी लक्ष्मण सोपान साठे (वय 58) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अक्षय दशरथ साठे (वय 32, रा. भवरापूर) आणि त्याचा साथीदार गोकुळ नाना कोकरे (वय 23, रा. आष्टापूर) यांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचा आरोप आहे. माहितीनुसार, जमीन गट क्र. 104 संदर्भातील जुन्या वादातून आणि नदीवरील मोटार दुरुस्तीच्या कारणावरून अक्षय साठे व अभिषेक साठे यांच्यात भांडण झाले होते. त्या रागातून आरोपींनी महेश साठे यांना जाणीवपूर्वक ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दुचाकीला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत महेश साठे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय साठे याच्यावर यापूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे 2019 साली वाहन अपघातासंदर्भात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुसरा आरोपी गोकुळ कोकरे याचा पूर्व इतिहास नसल्याचे सांगण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे करीत असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे भवरापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Summary : A young farmer was murdered in Uruli Kanchan over a land dispute. The accused intentionally rammed their car into his motorcycle, killing him instantly. Two suspects are in custody, and an investigation is underway.
Web Summary : उरुली कांचन में भूमि विवाद को लेकर एक युवा किसान की हत्या कर दी गई। आरोपियों ने जानबूझकर अपनी कार से उसकी मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। दो संदिग्ध हिरासत में हैं, और जांच जारी है।