लेखकाने सामाजिक किंवा धार्मिक दबावाला बळी न पडता मनातील विचार मुक्तपणे मांडावेत - विश्वास पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 17:08 IST2025-10-13T17:06:37+5:302025-10-13T17:08:55+5:30
लेखकाच्या अंगात एखाद्या विषयाचे झपाटलेपण येत नाही, तोपर्यंत त्या विषयाला न्याय दिल्यासारखे होत नाही

लेखकाने सामाजिक किंवा धार्मिक दबावाला बळी न पडता मनातील विचार मुक्तपणे मांडावेत - विश्वास पाटील
पुणे : लेखकाने राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक दबावाला बळी न पडता स्वतःच्या आणि लोकांच्या मनातील विचार मुक्तपणे मांडले पाहिजेत, असे मत ‘पानिपत’कार आणि नियाेजित संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयाेजित अभिजात मराठी शब्दोत्सव या ग्रंथ प्रदर्शनात ते बाेलत हाेते. हे प्रदर्शन दि. ९ नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार आहे. याचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले.
टिळक रस्ता येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात हा कार्यक्रम सोमवारी पार पडला. याप्रसंगी राजहंस प्रकाशनाचे संपादक शिरीष सहस्रबुद्धे, अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालिका रसिका राठिवडेकर आणि स्नेहा अवसरीकर उपस्थित होत्या. ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी पाटील यांची मुलाखत घेतली.
पाटील म्हणाले की, माझी अशीच एक गाजलेली कादंबरी ‘राजहंस’कडे प्रकाशनासाठी दिली हाेती; पण अपेक्षेप्रमाणे लेखन झाले नसल्याने संपादकीय मंडळ नाराज असल्याचे लक्षात आले. तेव्हा मी माजगावकर यांच्याकडून अधिकचा सहा महिन्यांचा कालावधी मागून घेतला आणि त्या कादंबरीला अंतिम रूप दिले.
शेवटच्या क्षणीसुद्धा तुम्हाला पुनर्विचार करावा लागू शकतो. कारण, लेखन ही एक प्रक्रिया असून, पुनर्लेखन हे खरे लेखन असते. लेखकाच्या अंगात एखाद्या विषयाचे झपाटलेपण येत नाही, तोपर्यंत त्या विषयाला न्याय दिल्यासारखे होत नाही. लेखकाने त्याच्या एखाद्या कथा-कादंबरीची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी लेखनासोबत पुनर्लेखनावरही भर देणे आवश्यक आहे. स्तुती करणारे मित्र आजूबाजूला ठेवण्यापेक्षा वेळ प्रसंगी कान पकडणारे आणि तुमच्याकडून अधिकची अपेक्षा करणारे वाचक आणि प्रकाशक तुमच्या आजूबाजूला असणे आवश्यक असते. याप्रसंगी विश्वास पाटील यांनी पानिपत, महानायक, लस्ट फॉर लालबाग आदी कादंबऱ्यांची निर्मितीमागच्या कथा उलगडून सांगितल्या. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानावरही भाष्य केले.