स्वारगेट येथील मेट्रोच्या पादचारी पुलाचे काम पूर्ण; नागरिकांना ये-जा करण्यासाठी लवकरच होणार खुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 17:43 IST2025-12-08T17:43:23+5:302025-12-08T17:43:34+5:30
या पादचारी पुलामुळे प्रवाशांना थेट स्वारगेट बसस्थानक आणि मेट्रो स्थानक ये-जा करण्यासाठी सोयीचे होणार आहे

स्वारगेट येथील मेट्रोच्या पादचारी पुलाचे काम पूर्ण; नागरिकांना ये-जा करण्यासाठी लवकरच होणार खुला
पुणे: स्वारगेट येथे मेट्रो आणि बसस्थानक यांना थेट जोडणाऱ्या पादचारी (भूमिगत) पुलाचे काम पूर्ण झाले आहे. प्रवाशांसाठी हा पादचारी मार्ग लवकरच खुला होणार आहे. महामेट्रोकडून या पुलाचे काम करण्यात आले. या पादचारी पुलामुळे प्रवाशांना थेट स्वारगेट बसस्थानक आणि मेट्रो स्थानक ये-जा करण्यासाठी सोयीचे होणार आहे. अंतिम सुरक्षा तपासणीसाठी रेल्वे मेट्रो सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस ) यांच्याकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
मेट्रो आणि एसटी स्थानक यांना जोडणारा अंडरपास बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात भूमिगत सेवा लाइन, वाहतुकीचा सामना करावा लागला. स्वारगेट परिसरातील सततची वाहतूक, मर्यादित कामाची वेळ आणि भूमिगत संरचना ही बांधकामातील मोठी आव्हाने होती. या सर्व अडचणी असूनही या पुलाचे काम पूर्ण झाले. भूमिगत रस्ता सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मेट्रो-बसस्थानक यांच्यात अखंड, सुरक्षित आणि प्रवास करता येणार आहे. रस्ता ओलांडण्याची गरज संपणार असल्याने अपघाताचा धोका कमी होणार आहे. गर्दीच्या वेळी बस-मेट्रो बदल करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला आणि सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच स्वारगेट परिसर हा पुण्यातील सर्वाधिक वर्दळीचा भाग मानला जातो. या ठिकाणी बस वाहतूक, पीएमपी, रिक्षा, खासगी वाहनांची मोठी गर्दी असते. दोन मोठ्या वाहतूक केंद्रांना जोडणारा सुरक्षित पादचारी मार्ग नसल्याने प्रवाशांना रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण होत होता. मेट्रो आणि एसटी यांना जोडणारा हा भूमिगत पूल सुरू झाल्यानंतर प्रवासी मेट्रोमधून थेट बसस्थानकात आणि बसस्थानकातून मेट्रोत कोणताही धोका न घेता जाऊ शकणार आहेत.
प्रवाशांचा सुरक्षित होणार प्रवास
स्वारगेट परिसरात दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. शिवाय चाैकात कायम वाहनांची वर्दळ असते. अशा वर्दळीतूनच प्रवाशांना जीव मुठीत धरून ये-जा करावे लागते. हा भूमिगत मार्ग सुरू झाल्यावर प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी सोयीचे होणार आहे. यामुळे नागरिकांचा अपघातविरहित प्रवास होणार आहे. या पादचारी पुलामुळे प्रवाशांना थेट स्वारगेट बसस्थानक आणि मेट्रो स्थानक ये-जा करण्यासाठी सोयीचे होणार आहे.