टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू; सिंहगड रस्त्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 10:24 IST2025-01-09T10:24:37+5:302025-01-09T10:24:43+5:30
संतोष हॉल चौकाजवळ आल्यानंतर पाठीमागून आलेल्या टेम्पोची महिलेला धडक बसली, या अपघातात त्यांच्या डोक्यात गंभीर इजा झाली

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू; सिंहगड रस्त्यावरील घटना
धायरी : भरधाव वेगाने निघालेल्या टेम्पोने दुचाकीस्वार महिलेला धडक दिली. यात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉल चौकात बुधवारी घडली. पूनम प्रफुल्ल वांजळे (वय ४५, रा. शनी मंदिरामागे, दत्तवाडी, पुणे) असे त्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी टेम्पो चालक बाळकृष्ण रबाजी गुंड (वय ४०, रा. वडगाव गुंड, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पूनम या नऱ्हे येथील एका खासगी कंपनीत कामास आहेत. त्या घरातून सकाळी लवकर आपल्या दुचाकीवरून स्वारगेटच्या दिशेकडून वडगाव पुलाच्या दिशेकडे जात होत्या. दरम्यान, संतोष हॉल चौकाजवळ आल्यानंतर पाठीमागून आलेल्या टेम्पोची त्यांना धडक बसली. या अपघातात त्यांच्या डोक्यात गंभीर इजा झाली. नागरिकांनी तातडीने त्यांना त्या खासगी रुग्णालय उपचारासाठी दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे, पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, निकेतन निंबाळकर आदींनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. अपघाताचा तपास सुरू आहे.