कात्रज: कात्रजकडून नवले पुलाकडे जाताना वंडर सिटीजवळ रविवारी अपघाताची घटना घडली असून यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पोने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीवरील एक महिला रस्त्यावर पडल्यानंतर आयशर टेम्पोने तिला काही अंतर फरफटत नेले. यामध्ये महिलेच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात स्कूटीवरील दुसरी महिलाही जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
या अपघातनंतर नागरिकांनी आयशर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघात झाल्यानंतर काही काळ अपघातस्थळी नागरिकांचा आक्रोश पाहायला मिळाला.वारंवार या ठिकाणी अपघात होत असल्याने कात्रज मधील अपघात थांबणार आणि निष्पाप लोकांचे आणखी किती दिवस बळी जाणार असा सवाल प्रत्यक्षदर्शींनी विचारला आहे.
रविवारी दुपारी एकच्या सुमारास कात्रज बायपास रोडवर वंडर सिटीच्या अलीकडे दुचाकी क्र. एम एच १२ एस. पी. १२६९ व ट्रक क्रमांक एम एच १६ सी सी ४३४५ यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये स्कूटी चालक महिला लहूबाई अश्रुबा वाघमारे (वय ४९ वर्ष रा. वाघजाई नगर आंबेगाव खुर्द) यांना भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर स्कुटीवरील दुसरी महिला प्रियांका राऊत (वय ३३ वर्षे) यांच्या पायाला फॅक्चर होऊन त्या जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महत्त्वाची बाब म्हणजे, अपघात झाल्यानंतर वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने लहूबाई वाघमारे यांना खाजगी वाहनाने रुग्णालयामध्ये नेण्यात आले. त्यामुळे नागरिकांचा प्रचंड संताप पहायला मिळाला. अपघातातील ट्रक चालक निलेश नांदगुडे (वय ३८) रा.इंदापूर याला आंबेगाव पोलिसांनी अटक केली असून वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच ट्रक पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनला पाठवण्यात आला असल्याचे आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी सांगितले.