पुण्यात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; दोन महिन्यापूर्वीच झाले होते लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 16:41 IST2021-12-13T16:41:16+5:302021-12-13T16:41:29+5:30
कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे

पुण्यात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; दोन महिन्यापूर्वीच झाले होते लग्न
धायरी : गोऱ्हे बुद्रुक येथील एका हॉटेलमध्ये ३२ वर्षीय विवाहीतेने छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. रंगोली भास्कर वडावराव (वय :३२ वर्षे रा. धानोरी,पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगोली वडावराव ही महिला दुपारी दोन वाजता सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील हॉटेलमध्ये एक दिवसाकरीता राहावयास आली होती. सायंकाळी वेटरने दरवाजा वाजवला असता आतून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल चालकाने पोलिसांनी कळवले. रात्री पोलीस आल्यानंतर दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामदास बाबर अधिक तपास करत आहेत.
दोन महिन्यापूर्वीच झाले होते लग्न
रंगोली वडावराव या पहिल्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न केले होते. त्यांना पहिल्या पतीपासून सात वर्षांचा एक मुलगा आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.