तोंड दाबून चाकूने गळा चिरला; नांदण्यास नकार दिल्याने पत्नीचा खून, पतीला २ तासात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:31 IST2025-07-28T18:31:22+5:302025-07-28T18:31:36+5:30

पतीला दारूचे व्यसन असल्याने तो तिला सतत त्रास देत होता, म्हणून ती आईकडे आली होती

Wife was murdered after refusing to give birth, husband arrested within 2 hours | तोंड दाबून चाकूने गळा चिरला; नांदण्यास नकार दिल्याने पत्नीचा खून, पतीला २ तासात अटक

तोंड दाबून चाकूने गळा चिरला; नांदण्यास नकार दिल्याने पत्नीचा खून, पतीला २ तासात अटक

पुणे: कौटुंबिक वादातून नांदायला येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करुन तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोन तासात पतीला अटक केली आहे. ममता प्रेम जाधव (२१, रा. काजळी तांडा, पिंपळगाव, ता. जिंतूर, जि. परभणी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ममताची मावशी रेश्मा रामेश्वर राठोड (२८, रा. खांदवेनगर, लोहगाव) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पती प्रेम उत्तम जाधव (२७, रा. काजळी तांडा, पिंपळगाव, ता. जिंतुर, जि. परभणी) याला अटक केली आहे. ही घटना खांदवेनगर येथे रविवारी (दि. २७) दुपारी सव्वा तीनच्या सुमरास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये प्रेम आणि ममताचा विवाह झाला होता. प्रेमला दारुचे व्यसन होते. तो तिला सतत त्रास देत होता. म्हणून मागील सहा महिन्यापासून ममता खांदवेनगर लोहगाव येथे आईसोबत राहण्यास आली होती. प्रेम फोन करून ममताला नांदण्यास ये म्हणत होता. परंतू दारु सोडल्याशिवाय नांदण्यास येणार नाही असे ती सांगत होती.

ममता तिच्या आईसोबत काम करत होती. तर फिर्यादी मावशी रेश्मा त्यांच्यासोबतच राहतात. रविवारी ममता आणि रेश्मा यांची सुट्टी असल्यामुळे त्या घरीच होत्या. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास प्रेम हा ममताला घरी घेऊन जाण्यास आला. त्यावेळी त्याच्या हातात पांढऱ्या रंगाची पिशवी होती. तो घरात खुर्चीवर बसला होता. तर ममता बेडवर बसली होती. त्याने ममताच्या चुलत्याला फोन करून तिला नांदण्यास पाठवा असे सांगितले. प्रेम याने त्यानंतर तो फोन ममताच्या मावशीकडे देऊन त्यांना बोलण्यास सांगितले. मावशी फोनवर बोलत खोलीबाहेर आली. दरम्यान, त्यांचा लहान मुलगा घरातून ओरडत बाहेर आला. मावशी रेश्मा यांनी खोलीत जाऊन बघितले असता, प्रेम डाव्या हाताने ममताचे तोंड दाबून उजव्या हाताने चाकूने तिचा गळा चिरत होता. ममताच्या गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. रेश्मा यांनी प्रेमचा हात पकडून त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने रेश्मा यांच्यावर देखील वार केला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो धक्का मारून पळून गेला. ममता रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडली होती. रेश्मा यांनी आरडा-ओरडा केला तेव्हा शेजारी राहणारे काही लोक धावत आले. त्यांनी ममताला रिक्षातून जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र जखम मोठी असल्याने त्यांनी तिला ससून रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्यांना तात्काळ रुग्णवाहिका मिळाली नाही. रस्त्यावरील एका कार चालकाच्या मदतीने ममताला ससून रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून ममताचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सोमय मुंंडे, एसीपी प्रांजली सोनवणे, विमातळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सपना देवतळे, समीर करपे, पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर अवघ्या दोन तासात आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. पोलिस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके पुढील तपास करत आहेत.

Web Title: Wife was murdered after refusing to give birth, husband arrested within 2 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.