हुंड्यातील ४ लाख आणण्याकरिता पत्नीला केरोसीन टाकून जाळले; पतीला जन्मठेप, पुण्यातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 20:21 IST2025-11-27T20:19:50+5:302025-11-27T20:21:04+5:30
मुलीच्या कुटुंबाची परिस्थिती बिकट असल्याने आणि वडील गेल्याने तिच्या भावाने एक लाख रुपये पहिल्या टप्प्यात दिले होते

हुंड्यातील ४ लाख आणण्याकरिता पत्नीला केरोसीन टाकून जाळले; पतीला जन्मठेप, पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुणे: लग्नामध्ये हुंड्यातील उर्वरित चार लाख रुपये माहेरून आणण्याकरिता पत्नीला जिवंत जाळून जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपीला वडगाव मावळच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि १८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी हा निकाल दिला. खटल्यात मृत महिलेने मृत्युपूर्वी दिलेला जबाब महत्त्वाचा ठरला.
सियाराम पंचम विश्वकर्मा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २०१२ मध्ये घडली. आरोपीसह कुटुंबातील आणखी सहाजणांवर देहू रोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सहाजणांची निर्दोष सुटका करण्यात आली. आरती सियाराम विश्वकर्मा असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिला आणि आरोपीचा दि. २ मे २००८ रोजी विवाह झाला होता. मुलीच्या कुटुंबाने लग्नात पाच लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. परंतु मुलीच्या कुटुंबाची परिस्थिती बिकट असल्याने आणि वडील गेल्याने तिच्या भावाने एक लाख रुपये पहिल्या टप्प्यात दिले.
लग्नानंतर दोनच महिन्यात पतीकडून शिवीगाळ आणि मारहाण सुरू झाली. या त्रासाला कंटाळून ती माहेरी गेली. दोन वर्षे तिथेच राहिली. मात्र दोन्ही कुटुंबाची बैठक झाली आणि पत्नीला शिवीगाळ व मारहाण करणार नाही, असे त्यांनी आश्वासन दिले. ती पुन्हा नांदायला गेली. मात्र पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाले. रागाच्या भरात पतीने पत्नीला शिवीगाळ, मारहाण केली आणि अंगावर केरोसीन टाकून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तिला रुग्णालयात नेले. तिथे पोलिसांनी तिचा जबाब घेतला आणि पतीला अटक करण्यात आली. न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील स्मिता चौगले यांनी चार साक्षीदारांची साक्ष नोंदविली. तसेच इतर पाच महत्त्वपूर्ण साक्षीदारांची साक्षी घेऊन न्यायालयासमोर प्रभावीपणे बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. देहू रोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, कोर्ट पैरवी अंमलदार हवालदार पी. घाटे, पीएसआय निंबाळे यांनी सहकार्य केले.