साडीत उंदीर काय जातो, डास काय चावतात; बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरावस्थेवरून अभिनेत्री अमृता देशमुख संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:58 IST2026-01-12T17:57:26+5:302026-01-12T17:58:20+5:30
प्रयोगाच्या १० मिनिटे आम्ही व्यवस्थापकांना सांगणार मग त्यांचे कर्मचारी तेवढ्यापुरते साफसफाई करून जाणार, कायमस्वरूपी हा प्रश्न कधी सुटणार? देशमुख यांचा सवाल

साडीत उंदीर काय जातो, डास काय चावतात; बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरावस्थेवरून अभिनेत्री अमृता देशमुख संतप्त
पुणे : पुण्याचा सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला नवीन झळाळी प्राप्त झाली खरी; पण नाट्यगृहाच्या दुरवस्थेचा प्रश्न 'जैसे थे'चं राहिला आहे. रविवारी (दि. ११) बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रयोग असलेल्या अभिनेत्री अमृता देशमुख यांनी फेसबुक लाईव्हमधून नाट्यगृहांमधील अस्वच्छ स्वच्छतागृहांचा मुद्दा उपस्थित केला आहे. रंगमंदिरात कार्यक्रमांना येणाऱ्या व्हीआयपी लोकांसाठी सुसज्ज कक्ष, मग रंगमकर्मींच्या बाबतीत दुजाभाव का? असा संतप्त सवाल अभिनेत्रीने केला आहे.
सध्या पुण्यात महापालिकेची रणधुमाळी सुरू आहे. विविध पक्षांचे उमेदवार नागरिकांवर आश्वासनाची खैरात करत आहेत, पण सांस्कृतिक नगरीत महापालिकेच्याच बालगंधर्वांसारख्या नाट्यगृहांकडे कुणाचेच लक्ष नसल्याची वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे. मार्च २०२४ मध्ये बालगंधर्व रंगमंदिराचा कायापालट करण्यात आला. भिंतींची रंगरंगोटी, व्हीआयपी रूम, मेकअप रूम, बैठक व्यवस्था, परिसर आदी सर्व गोष्टी बदलून बालगंधर्व नाट्यगृहाला नवीन झळाळी देण्यात आली पण लाखो रुपये खर्च करून नाट्यगृहाची दुरवस्था कायम असल्याचे दिसून आले आहे. आजही स्वच्छतागृहांची स्थिती 'जैसे थे' च आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये बालगंधर्व कलादालनाच्या सिलिंगचा भाग कोसळला होता. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी नाट्यगृहातील असुविधांचा प्रश्न कायमच राहिला आहे.
अभिनेत्री अमृता देशमुख यांनी फेसबुक व्हिडिओच्या माध्यमातून रंगमंदिरातील स्वच्छतागृहांचा मुद्दा उपस्थित केला आहे. " आर्टिस्ट येतात, मनापासून प्रयोग करतात, निघून जातात म्हणून किती गृहीत धरावं. साडीत उंदीर काय जातो, डास काय चावतात, प्रेक्षक नाटकांच्या प्रेमापोटी येतात, जातात त्यांना पण असाच गृहीत धरायचं? कधी बदलणार ही परिस्थिती? सांस्कृतिक शहर म्हणायचं आणि तिथल्या एका नावाजलेल्या नाट्यगृहाची ही अवस्था? असे सांगत देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात महापालिका सांस्कृतिक उपायुक्त आणि बालगंधर्व व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता निवडणुकीच्या कामात असल्याचे सांगण्यात आले.
पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून मिरवत असताना बालगंधर्व रंगमंदिरासारख्या नावाजलेल्या नाट्यगृहाची ही दयनीय अवस्था अत्यंत दुर्दैवी आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या रणधुमाळीचा असताना सांस्कृतिक वारशाकडे होणारे हे दुर्लक्ष अधिकच खटकणारे आहे. अभिनेत्री अमृता देशमुख यांनी फेसबुक लाईव्हमधून मांडलेली व्यथा म्हणजे एका कलाकाराची नव्हे, तर संपूर्ण रंगभूमीची वेदना असून यांनी आता तरी केवळ आश्वासनांऐवजी तातडीने ठोस पावले उचलावीत.- ” बाबासाहेब पाटील : प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग
बालगंधर्व रंगमंदिरात दरवेळी हा अनुभव कलाकारांना येतो. प्रयोगाच्या दहा मिनिटे आम्ही व्यवस्थापकांना सांगणार मग त्यांचे कर्मचारी तेवढ्यापुरते साफसफाई करून जाणार, कायमस्वरूपी हा प्रश्न कधी सुटणार? स्वच्छतागृह स्वच्छ कधीच दिसत नाहीत. चार प्रयोग असतील तर चारवेळा ते स्वच्छ झाले पाहिजेत, पण तसे होत नाही. मी कर्मचाऱ्याला बोलावून आणले पण तो वरवरचे स्वच्छ करत होता. व्हीआयपी रूम चांगली करता येते, मग स्वच्छतागृह का नाहीत? - अमृता देशमुख, अभिनेत्री