कोर्टाच्या आदेशानंतरही पोलिसांनी पासपोर्ट का जप्त केला नाही ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:38 IST2025-10-09T09:34:38+5:302025-10-09T09:38:36+5:30
न्यायालयाच्या आदेशानंतरही घायवळने पासपोर्ट संदर्भातील माहिती लपवली

कोर्टाच्या आदेशानंतरही पोलिसांनी पासपोर्ट का जप्त केला नाही ?
पुणे : गँगस्टर नीलेश घायवळ याच्या परदेशवारीबाबत नवीन माहिती समोर आली आहे. घायवळविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याला विशिष्ट अटींवर २०२२ मध्ये न्यायालयीन जामीन मंजूर करण्यात आला होता. या अटींमध्ये पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र न्यायालयीन आदेश असूनही पासपोर्ट पोलिसांच्या ताब्यात का आला नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसे झाले असते तर घायवळ देशाबहेर जाऊच शकला नसता, असे बोलले जात आहे.
२०१९ मध्ये मिळवला पासपोर्ट : नीलेश घायवळ याने २०१९ मध्ये अहिल्यानगर येथून तत्काळ योजनेतून नीलेश गायवळ या नावाने पासपोर्ट मिळवल्याचे पोलिस तपासात समोर आले.
तत्काळ पासपोर्ट आणि पडताळणी : तत्काळ योजनेत अर्जदाराला जलद पासपोर्ट मिळतो. या प्रक्रियेत पासपोर्ट आधी दिला जातो आणि नंतर काही दिवसांत पोलिस पडताळणी केली जाते. पडताळणी अहवाल नकारात्मक आल्यास पुढे पासपोर्ट ॲक्टनुसार पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई करता येते.
पोलिसांचा पडताळणी अहवाल : घायवळने २०१९ मध्ये तत्काळ योजनेतून मिळवलेल्या पासपोर्टसाठी झालेल्या पोलिस पडताळणी अहवालात (पोलिस व्हेरिफिकेशन) त्याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच त्याने पासपोर्ट काढताना दिलेल्या पत्त्यावर ''नॉट अव्हेलेबल'' असा शेरा देण्यात आला होता. वास्तविक पाहता संबंधित पोलिसांनी गुन्ह्याची माहिती अहवालात देणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेले दिसत नाही. यामुळे त्याचा पासपोर्ट कायम ठेवण्यात अडचण आली नाही.
पासपोर्टविषयी पुढील कारवाई : घायवळने पासपोर्ट अर्ज करताना स्वतःविरुद्ध असलेले गुन्हे लपवून चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर करून २०१९ मध्ये पासपोर्ट मिळवला होता. पोलिसांनी आरोपी देशाबाहेर गेल्यानंतर हा प्रकार पासपोर्ट कार्यालयाला निदर्शनास आणून दिला. त्यानंतर त्याचा पासपोर्ट जप्तीबाबत कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.