'तु कोण मला सांगणार', छातीत मारल्या बुक्क्या, काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारींसह ५ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:26 IST2025-08-07T13:23:49+5:302025-08-07T13:26:51+5:30
एकदा धमकी देऊन गेल्यानंतर पुन्हा रात्री येऊन तिवारी यांच्या साथीदारांनी कोयत्याने हल्ला केला

'तु कोण मला सांगणार', छातीत मारल्या बुक्क्या, काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारींसह ५ जणांवर गुन्हा दाखल
पुणे : काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ प्रवक्ते, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांच्यासह पाच जणांविरोधात विश्रामबाग पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. बोर्ड लावल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला असून, दोघांनी दिलेल्या तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. नारायण पेठेतील केळकर रस्त्यावर तिवारी यांचे मुरलीधर व्हेज हे हॉटेल आहे. त्यापासून जवळच असलेल्या निघोजकर मंगल कार्यालयाजवळ मंगळवारी (दि. ५) रात्री पावणे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
स्वप्नील रामचंद्र मोरे (३४, रा. नारायणपेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी गोपाळ शंकर तिवारी (६६, रा. घोलेरोड, शिवाजीनगर), हर्ष उर्फ नन्नू शंकर शिर्के (२९, रा. नारायणपेठ), निखिल दिलीप जगताप (३३, रा. शनिवार पेठ), मुकुंद शंकर शिर्के (२७, रा. नारायणपेठ) आणि अभिषेक उमेश थोरात (२२, रा. दत्तवाडी) यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील हर्ष, निखील, मुकुंद आणि अभिषेक या चौघांना पोलिसांनी अटक केली असून, गोपाळ तिवारी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोरे यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुरलीधर हॉटेलच्या जवळील पूजा पेंटरच्या समोर सार्वजनिक रोडवर एक काळ्या रंगाचा बोर्ड लावला होता. तो काढण्यासाठी तिवारी आणि त्यांचे साथीदार तेथे आले. ते बोर्ड काढत असताना मोरे यांनी त्यांना तो काढू नका. तो बेकायदेशीर असल्यास महापालिका काढून घेईल असे म्हटले. त्यावेळी हर्ष याने मोरे यांना तु कोण मला सांगणार असे म्हणत झटापट करून छातीत बुक्क्या मारल्या. हा प्रकार घडल्यानंतर मोरे यांनी पोलिस चौकीत याबाबत तक्रार दिली होती. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीची यादी देऊन त्यांना ससून रुग्णालयात जाण्यास सांगितले होते. मात्र मोरे त्यानंतर पोलिस चौकीत आले नाहीत असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले. दरम्यान, रात्री पावणे नऊच्या सुमारास मोरे हे मित्रासह केळकर रोडवर मित्रासोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी परत हर्ष, निखिल आणि त्यांचे इतर साथीदार दुचाकीवरून तेथे आले. हर्ष याने त्याच्याकडील कोयत्याने मोरे यांच्या बोटावर आणि पाठीवर वार केले. तर निखिल याने लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यांच्या मित्रांनी आरडा-ओरडा करताच आरोपींनी तेथून पळ काढला. आरोपींच्या हल्ल्यात मोरे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
तर मुकुंद शंकर शिर्के (२७, रा. नारायणपेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी स्वप्निल उर्फ बाबा मोरे आणि त्याच्या पाच ते सात साथीदारांविरोधात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. स्वप्निल मोरे आणि त्याच्या पाच ते सात साथीदारांनी फिर्यादींचा भाऊ हर्ष शिर्के याच्याबरोबर झालेल्या वादातून त्यांना लोखंडी रॉडने पाठीवर मारहाण केली. तसेच त्यांचा मित्र निखिल जगताप याला लाथाबुक्याने मारहाण करण्यात आली आहे. आरोपींनी फिर्यादींना दगडे फेकून मारली असून, गाडीचे दगडाने आणि लोखंडी रॉडने तोडफोड करून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
बोर्ड काढण्याच्या कारणातून झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी आलेल्या तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून, काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. - संतोष पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे