५ मोबाइल, २ पाॅवर बँक, चार्जिंग वायर आले कुठून? येरवडा कारागृहातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 10:54 IST2026-02-26T10:53:54+5:302026-02-26T10:54:12+5:30
कारागृहात मोबाइल वापरास बंदी असताना आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे

५ मोबाइल, २ पाॅवर बँक, चार्जिंग वायर आले कुठून? येरवडा कारागृहातील धक्कादायक प्रकार
पुणे: येरवडा कारागृह प्रशासनाने राबवलेल्या तपासणी मोहिमेत कारागृहातील बराकीमध्ये पाच मोबाइल संच, दोन पाॅवर बँक, चार्जिंग वायर सापडली. या प्रकरणी सहायक तुरुंगाधिकारी सुनील गायकवाड यांनी कैदी नौशाद बद्रुद्दीन शेख याच्यासह अन्य कैद्यांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी येरवडा कारागृहात गायकवाड हे नियमित गस्त (संचारफेरी) घालत होते. त्या वेळी कारागृहातील भिंतीजवळ असलेल्या स्वच्छतागृहाजवळ एक कैदी थांबला होता. त्याच्या संशयास्पद हालचालीवरून त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने जमिनीवर मोबाइल पडल्याचे सांगितले. त्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देऊन बराकीत गेला.
त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहादरम्यान तपास मोहीम राबविण्यात आली. यावेळी बराक क्रमांक एकमधील कैदी नौशाद शेख याची झडती घेतली. त्यावेळी एका पिशवीत एक मोबाइल, बॅटरी, सिम कार्ड, चार्जिंग वायर सापडली. त्यानंतर बराक क्रमांक एक, दोन, सहाची झडती घेतल्यानंतर चार मोबाइल, बॅटरी, दोन पाॅवर बँक सापडल्या. कारागृहात मोबाइल वापरास बंदी असताना आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस उपनिरीक्षक कुंदन सत्रे तपास करत आहेत.